पाचवा प्रणववेद प्रकट झाल्याखेरीस ही जी देवाण घेवाणीची तऱ्हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान-प्रदानतेची तऱ्हा साध्य होणार नाही, साध्य होऊ शकणार नाही. पण पाचवा प्रणववेद सिद्ध होण्यासाठी, सापडण्यासाठी भक्ताने वा सवेकऱ्याने काय केले पाहिजे? नामस्मरण! मनाने झटले पाहिजे. सेवेकरी नामस्मरण करतोच आहे आम्ही नाही असे म्हणत नाही, पण नामस्मरण कसे केले पाहिजे?
नामस्मरण हा एक प्रकारचा नाद आहे. तो नाद असा असला पाहिजे की तो पार ब्रम्हानंदाप्रत घेऊन गेला पाहिजे. त्या अनंतांच्या कानापर्यंत त्या नामस्मरणाचा नाद पोहोचला पाहिजे. ती नामस्मरणाची ओढण ॐकारांप्रत पोहोचली पाहिजे.
लक्षात घ्या ध्यानधारणेकरीता आसन आहे. अर्थात ध्यानधारणा आसन घालून करता येते, पण नामस्मरण करताना इकडे, तिकडे लक्ष जात असेल तर ते नामस्मरण काहीही उपयोगाचे नाही. नामस्मरण मुखाने चालू असताना, नेत्र आपले काम करणार, कान आपले काम करणार! म्हणून नामस्मरण करताना नाम अशा तऱ्हेने घेतले पाहिजे की कानांना फक्त नामाचाच ध्वनी ऐकायला यायला हवा. बाहेरचे इतरत्र ध्वनी कानावर येताच कामा नयेत. नेत्रांसमोर केवळ सद्गुरूंची छबी तरळली पाहिजे. असे झाल्यानंतर डोळे आपोआप स्थिर होतील. पापण्या जराही हलणार नाहीत. मग ते नाम अन ते ध्यान! दोघांची संयुक्तता साधली अन त्यात स्थिर झाले मग नाद वरपर्यंत येणे ब्रह्मानंदाप्रत पोहोचतो. अशा तऱ्हेने या चाकोरीतून एकदा का सेवेकरी उर्ध्वतेने वाटचाल करू लागला तर आम्ही खात्रीने सांगतो पाचवा प्रणववेद प्रगट होणारच. पण पाचवा प्रणववेद प्रगट होण्यासाठी सद्गुरु दर्शन हे आवश्यक आहे. सद्गुरु दर्शन ही सर्वात प्रथम पायरी. सद्गुरु दर्शनानंतर सूक्ष्म गती ही पुढची पायरी. ©️
