पाचवा प्रणववेद कशामुळे मिळतो? कशामुळे प्राप्त होते? तर ज्ञानमार्गामुळे मिळतो. स्वयंम प्रकाशाच्या गतीने जाणे हाच ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या गतीने आपण सेवेकरी नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करत करत एकदा का सद्गुरूंची जाणीव मिळाली, दर्शन मिळाले, सद्गुरूंशी बोलणे, चालणे होऊ लागले म्हणजेच पाचवा प्रणववेद प्रगट झाला. जरी पाचवा प्रणववेद प्रगट झाला तरी त्यातही आपल्याला भर घालावयाची आहे.
प्रणव येणे बोल. जसे आपण बोलणे ऐकतो त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करीत गेल्यानंतर, ॐकार स्वरूपी ध्वनी युक्त बोल आपल्याला स्पष्ट ऐकू येतात. आपणही त्यांच्याबरोबर बोलणे करू शकतो. असे झाले म्हणजेच पाचवा प्रणववेद प्रगट झाला असे म्हणता येईल, मग अशी ज्योत सद्गुरु सानिध्याने कुठेही जाऊ शकते. सद्गुरू सानिध्याशिवाय हे होणे शक्य नाही. पाचवा प्रणववेद प्रगट झाल्याशिवाय आपल्याला गुरुगुह्य काय आहे हे समजणार नाही. जोपर्यंत सेवेकरी वा भक्त पाचवा प्रणववेद प्रगट करू शकत नाही तोपर्यंत आपले सद्गुरु काय आहेत याची तो जाणीव घेऊ शकणार नाही. आपले सद्गुरू ओळखू शकणार नाही.
पाचवा प्रणववेद सुरू झाल्यानंतर कोणत्याही तत्त्वाशी तो व्यवहार करू शकतो. आम्ही हे म्हणतो हे खरे कशावरून? तर आपली प्रकाशित ज्योत आम्ही दिलेले संदेश कोणत्याही तत्त्वापर्यंत पोहोचते करू शकते की नाही? सद्गुरूंना संदेश द्यावयाचे असतील तर ते कोणत्याही तत्त्वाला देऊ शकतात. हाच पाचवा प्रणव वेद. आपण पाहतो आपली प्रकाशित ज्योत, स्थूलाने जरी येथे बसलेली असली तरी सूक्ष्माने कुठेही आदेशानुसार जाऊन येते की नाही?..©️
