श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज –
अरे! तुमच्या हृदयात देखील तेच (सतच) वास करीत आहे, मग त्याला तुमचे काय चालले आहे ते कळत नाही का? ज्योतीच्या आत वास करणारे, सांगत आहे की ज्योतीला पूर्ण कळत आहे ती काय करीत आहे.
तुम्ही सांगा, मानवी स्थूलाला आतले अन बाहेरचे काही कळते का? त्याला त्याची जाणीव आहे का? तुम्ही त्यांच्यापासून लाखो कोसांवर जा. तुम्ही गेलात म्हणजे स्थूल गेले. तुमच्या स्थुलात वास करणारे तत्व तुमच्याबरोबर आहे. ते आहे म्हणून तुम्ही गेलात. कोणाच्या साह्याने गेलात? तत्वाच्या सहाय्याने गेलात. ते तत्व मनाजवळून तुमचे शरीर हलवून घेते. ज्या सताचे सतचरण तुम्ही पाहणार आहात ते तत्व! मनाला जाणीव देऊन मनाला हलवते. म्हणजेच ते तत्व तुम्हाला सोडून असते का नसते?
तुम्ही कुठेही जरी गेलात तरी ते तुमच्या बरोबर असते. सत हे सगळीकडे असते अन त्याला सर्वस्वाची जाण असते. या पंचमहाभूताच्या कवचामध्ये ते वास करून आहेत. लक्षात घ्या, मला सोडून सत नाहीत आणि सतांना सोडून मी नाही. मी आणि माझे सत एकमेकांना बांधील आहोत. मग जे स्थूल आहे ते त्यांच्याजवळ स्थिर का नाही करत? तू आणि सत एकच आहेत. कवचात तुही आहेस अन कवचात सत म्हणते, मी देखील आहे…©️
