अन एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले? एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व प्रगट झाले. सेवेकरी या गतीने जात जात जर सद्गुरुमय बनला मग वेगळे शिल्लक काय राहिले? हे होण्यासाठी सर्वात प्रथम मन शुद्ध सुचिर्भूत कर.
लक्षात ठेवा, सद्गुरु मनाची पाहणी प्रथम करतात. सेवेकरी मनाने सद्गुरूंशी किती तन्मय आहे ही पाहणी प्रथम असते. तुमच्या तनाची वा धनाची पाहणी ते करत नाहीत. मन जर सद्गुरूंच्या ठायी पूर्णत्व अर्पण केलेले असेल तर तन आणि धन हे अर्पणच असते. मनच जर सद्गुरुमय झाले मग वेगळे काय राहिले? सेवेकऱ्याने जर पूर्णत्वाने मन माझ्या ठिकाणी अर्पण केलेले आहे मग सद्गुरु म्हणतात, त्याला मी माझ्या वेगळा का ठेऊ? जे मन सतावेगळे दुसरे काही पाहत नाही मग ते सतापासून दूर राहू शकेल का? शक्य नाही. अशा ज्योतीला आज ना उद्या जवळ करतीलच! त्याला पाचव्या प्रणव वेदाचा गाभा पाहता येईल. अशा त्या भक्ताला ते सत सर्वस्व दाखवतील.
सतचरण मिळवायचे असतील तर सतचरणांवर सर्वात प्रथम काय अर्पण केले पाहिजे? तर मन! पण ते मन पूर्णत्वाने अर्पण होत नाही. हीच या कलियुगातली मेख आहे. अनंतांनी आपल्या संदेशात सांगितले आहे,”सत युगात जसा कस होता तसा कस आता घ्यायचा नाही.” पण या कलियुगात मनाचा कस मात्र त्यांनी ठेवलेला आहे. पण सेवेकरी मनाच्या कसात उतरत नाहीत. फक्त म्हणतात,”सतावेगळा मी नाही, माझ्या वेगळे सत नाही.” लक्षात घ्या सेवेकऱ्यांनो हे मन ज्यावेळेस प्रगट होईल त्यावेळेस पाचवा प्रणव वेद प्रगट होईल. पण मनच प्रगट होत नाही तर पाचवा प्रणव वेद प्रगट कसा होईल?…©️
