अलख – नामस्मरणात बसल्यानंतर, अखण्ड नाम चालू असताना मन मायावी जाळ्यात गुंतवले तर त्याला अर्थ नाही. असे नामस्मरण मालकांच्या चरणांवर रूजू होईल काय? तासन् तास बसण्यापेक्षा पाचच मिनिटे बसा. सर्वस्व विसरा. मालिक आणि मी, बाकी काही नाही. अशा तऱ्हेने बसलात तर होईल. तासन् तास बसून, दुनियेच्या वदघटित मन गुंतवणे, विचार करणे, त्या नामाचा उपयोग नाही. तसे न करता, असे करा, म्हणजे त्या पदाला जाल. ते का होत नाही? किती सांगितले?
साधत नसेल, तर विचार करा. कसे बोलावे, कसे चालावे, वागावे म्हणजे मी सत् पदाला जाईन? तसे न करता, सेवेकरी प्रवचन ऐकतात. दरबाराच्या बाहेर गेल्यावर सर्व विसरतात. जे अमोलीक बोल ऐकता, ते बोल अनाठायी घालवू नका. जाऊ देवू नका. विचार करा. तुमची तुम्हालाच उत्तरे मिळतील. ज्ञानाची भर पडेल. सेवेकऱ्यास पुष्कळ सांगतात, पण ते ऐकत नाहीत. सेवेकरी कृती करीत नसेल, तर मालिक काय करणार? सत कृती असेल, तर संचिताचा नाश होतो. असत कृतीने संचिताचे डोंगर वाढतात.
पूर्व योनीत सत् कृती म्हणून हा मार्ग मिळाला आहे. आता सत कृती केल्यास पुढे हक्काने मानव जन्म मिळेल. सेवेकरी ज्यावेळेस अनुग्रहित होतो, त्यावेळेला नाश कसा होईल? आपली कृती सत होईल, अशा तऱ्हेने कर्तव्य करीत गेले पाहिजे. सदगुरू अनुग्रह हे एक प्रकारचे वळण आहे. ज्यावेळेला मानवाला जन्माला घालतात, ते त्याच्या सत् कृतीमुळे! मोठे झाल्यानंतर ज्याप्रमाणे असत कृती, त्याप्रमाणे संचित जमा होते. पुढे जर सत् कृतीने जाल, तर सत् संचित जमा होईल. ©️