हल्लीचा मानव, त्याच्याजवळ थोडे जरी काही असले की त्याला अभिमान निर्माण होतो. विशेष आहे असे त्याला वाटत असते. पण याचे खंडन करणारा कोणीतरी आहे की नाही याची गती त्याला मिळत नाही. हे विशेष काही नसून मरणाचे घर आहे, असे मला वाटते. हे ज्याच्या जवळ असते त्याला नरक कुंडाची गती मिळाल्याशिवाय राहत नाही. हे अघोर मानव आहेत. त्यांना एक वेळ तरी नरक भक्षण केल्याशिवाय हे साध्य होत नाही आणि दुसरी साबरी विद्या ! त्याला समर्थ दर्शन नाही. तो दैवतांच्या ऋद्धी सिद्धीच्या आधिन होऊन पिशाश्च होऊन राहतो.
आम्हाला सुद्धा वाटत होते, पण इतकेच, आम्ही समर्थ ध्यान विसरलो नाही. पण या गाठोड्यामुळे विशेष अहंकार निर्माण झाला होता. त्यामुळे माझ्या माऊलीने चमत्कार करून दाखविला. पण त्यांना तसे काही वाटत नाही. ज्याला भक्तीचे मूळ सापडले, त्याला याची आवश्यकता नाही.
मंत्राचा मंत्र, सिद्धाचा सिद्ध आहे. तो सापडल्यानंतर इतरांची जरुरी नाही. सर्व मंत्रांचा मंत्र, तंत्राचा तंत्र एकच आहे, ती म्हणजे सद्गुरु माऊली आहे. ती सगुण साकार आणि निर्गुण निराकार आहे. सगुण रूप बनविले ते का? तर त्या निराकार तत्वाने सगुण कपाट बनवून आपण त्या कपाटात निर्गुण रूपाने राहिले आहेत. या प्रकृतीला समर्थ अंत:र्यामी आहेत म्हणून शोभा आहे. ते जर नसतील तर याला शोभा आहे का? म्हणून निर्गुण हेच अंत:र्यामी आहेत. हे म्हणायला कोणती हरकत आहे? म्हणून ते सगुणही आहेत आणि निर्गुणही आहेत. निर्गुण सगुणातून बाहेर पडल्यानंतर, ते बोलते का? निर्गुण हेच आकारी आहेत. हे म्हणायला कोणती हरकत आहे? निर्गुण हेच आकारी बनतात आणि जगाला ज्ञान पाजतात. म्हणून सगुण निर्गुण दोन्ही एकच आहेत. मला तर या वेगळे काही दिसत नाही. (समाप्त) ©️