जीव आणि ब्रह्म – सेवेकरी कोणत्या स्थितीत असतो? तर जीव स्थितीत. सद्गुरु कोणत्या स्थितीत असतात? तर परब्रह्म स्थितीत ! जीव येणे आत्मा येणे नाम जीवात्मा. जीव आत्मस्थितीत असणे म्हणजेच जीवात्मा स्थितीत असणे होय. सद्गुरु परब्रह्म स्थितीत असतात. जीवात्मा शिवात्मा स्थितीत म्हणजे परब्रह्म स्थितीत एकात्म, एकरूप, एकलय झाल्याखेरीज परब्रह्म अथवा सद्गुरूंची दर्शन स्थिती प्राप्त होत नाही.
जीव परब्रह्मात एकलय कसा आणि कोणामुळे होईल? तर सद्गुरूं मुळे होईल. त्यासाठी सद्गुरूंनी सतपदाच्या आसनावरून जे अखंड नाम आपणास बहाल केलेले आहे, त्याच्यात तो प्रथमतः पूर्णत्व लय झाला पाहिजे. तदनंतरच जीव परब्रह्मात लय होईल.
सताने नाम आपणाप्रत कशासाठी प्रदान केले आहे? आपल्या सद्गुरूंनी सताला पाहण्यासाठी आपल्याला अखंड नाम बहाल केलेले आहे. जीवात्मा तुमच्या शरीरात असतो, तर आपले मन या भवसागरात फिरत असते, ते आपणास फिरवित असते.
मनाला स्थिर आणि शांत कोण करते? तर अखंड नाम ! सेवेकरी नाममय झाल्यावर, मगच त्याचे मन स्थिर होते आणि ते सद्गुरु करून घेत असतात. मन स्थिर झाल्यानंतर, आपला आत्मा स्वयम् प्रकाशित होतो व तो स्वयंप्रकाशित झाल्यानंतर, आपल्या आतील आत्म्याचे संधान परमात्म्याशी होते. म्हणूनच मानवाने सताचे सतत नामस्मरण केले पाहिजे. आपल्या सद्गुरूंना कदापिही विसरता कामा नये. नामस्मरण विसरता कामा नये. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी कुठेही असो आपण सातत्याने नामस्मरण केले पाहिजे. एकलयतेने नामस्मरण केले पाहिजे. तरच आपले सद्गुरु आपले मन स्थिर आणि शांत करून घेतील व आपले दर्शन आपणाला देतील. ©️