मानवाने सदिच्छा, सत् भावना, सत् संग या योगानें आपले कार्य भूतलावर करीत राहावे. सत् शिष्य सद्गुरूला तन, मन, धन अर्पण करून शरण जातो आणि अमूल्य असा ठेवा त्याजजवळ शिल्लक राहतो. हा अमूल्य ठेवा म्हणजेच सद्गुरु ठेवा होय.
सत् शिष्य हा सद्गुरुंचा दास, सद्गुरु सत् शिष्यांचे दास. असे हे वलय एकमेकां भोवती गुरफटलेले आहे. आपल्या मनाची, मायावी बंधनाची जाळी तोडून सद्गुरुंचा शोध घेण्यासाठी जावयाचे आहे. हा शोध घेणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यांची जाण घेण्यासाठी प्राणायामाची आवश्यकता नाही. या योगे त्यांची ओळख होणे शक्य नाही.
रिद्धी सिद्धी, तंत्र मंत्र ह्या परिभ्रमणाच्या पायऱ्या आहेत. ह्या सद्गुरु शोधण्याच्या पायऱ्या नव्हेत. सद्गुरु शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सद्गुरु चरणांवर तन, मन, धन अर्पण करणे. सत् विवेक, सत् संग, सत् आचार, सद्बुद्धी, अत्यंत लीनता, अत्यंत नम्रता, सत् भक्ती, सत् मार्ग यांची कास धरणे !
मी कोण? याची जाण घेणे, त्याची ओळख करून घेणे. जी सर्वस्वाची घडण होते, ती कोणाच्या सत्तेने होते? याचा ठाम विचार करणे. या सर्वांची ज्याने ओळख करून घेतली, त्याच्या पासून सद्गुरु दुर नाहीत. अशा तऱ्हेने ओळख करून घेण्यासाठी, सद्गुरु चरणांच्या दर्शनासाठी आतुर होवून आपले कर्तव्य कर्म करीत राहणे हेच सर्व श्रेष्ठ कर्तव्य आहे. ©️