मायावी कवचात दडून, सेवेकरी काय काय करतात याची सर्व नोंद आहे. सेवेकऱ्यांनी लक्षात ठेवणे, जे बाबा आसनावर आहेत, ते कोणत्या रितीने आणि केव्हा कस घेतील, याची जाणीव देणार नाहीत. एवढे लक्षात ठेवणे, कस जरी घेतला, तरी दुसऱ्याच्या दारावर भिक मागण्यास ते लावणार नाहीत. प्रत्येक सेवेकऱ्याने धडपड करणे. मनाचा ठाम निश्चय करून, आपल्या सद्गुरुंचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. मग मालिक या कार्यातून पार पाडणार नाहीत कां? ठाम बनून कार्याला तत्पर राहिले पाहिजे. त्याप्रमाणे राहिल्यास, सर्वस्व होईल.
ऋषींमुनीं दर्शनाकरीता धडपड करतात. त्यांना दर्शन मिळत नाही. आपल्या सेवेकऱ्यांना ते स्थुलांगी दर्शन देतात, मग आपले सेवेकरी भाग्यवान नाहीत कां? कुठल्याही मानवाने जगात ईश्वर नाही असे म्हणू नये. पण पाहण्याची तऱ्हा निराळी असते याची जाणीव करून घ्यावयास पाहिजे.
पूर्वीचा काळ वेगळा होता. हा कली आहे, म्हणजेच माया! हिलाच दूर ढकलावयाचे असते. एकच, अखंड नामात दंग असल्यानंतर हा कली काय करणार आहे? माया प्रत्येकाला आहे. आपले व्यवहार असत असल्यावर, ती बनवणार नाही कां? परंतु आपणांस जी वळणे घालून दिलीत, त्याप्रमाणे कृतीमान व्हा! माया काहीं करणार नाही. जे तुम्हाला अर्पण करावयाचे ते एकच, अखंड नाम! अखंड नामाचा उजाळा करा. अखंड दर्शन मिळवा, म्हणजे सर्वस्व अर्पण केल्यासारखे होईल. मालकांना हेच हवे असते. कोणत्याही सेवेकऱ्यांचे याप्रमाणे नामस्मरण होऊ लागले, म्हणजे आनंद होत असतो. त्यात कोणत्याही लटपटी चालत नाहीत. (समाप्त) ©️