सतभक्ताने आपण एक समर्थांचा कण आहोत, असे समजून चालावे. आपण समर्थांचा सेवेकरी आहोत हे जाणून घेऊन, आपण कोणत्या ठिकाणी जावे, कसे राहावे, समर्थांच्या ठिकाणी लय व्हावे कि आणखी जन्म घ्यावेत याचे मनन, चिंतन करणे. सत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे मानव जन्म हक्काने मिळेल.
एका बीजापासून किती उत्पत्ती होते हे तुम्हाला माहित आहे. मुळात बीज कोठून आले आहे, कोणी फेकले आहे, याची माहिती आपणाला मिळाली आहे का? मग बीज दाता किती लांब आहे, किती अंतरावर आहे? बीजात कोण आहे? तर मीच आहे. स्थूल, सुक्ष्म, कारण, महाकारणातही मीच आहे. चेतनात, अचेतनातही मीच आहे. मला आदि, अंत, मध्य काहीही नाही. त्या पात्रतेचा भक्त असेल तरच तो मला कोठेही पाहू शकतो.
सतभक्त हा कसा पाहिजे? तर सतभक्त हा सतशुद्ध पाहिजे नाही का? मग गप्पा मारून, टिंगल टवाळी करून, खवचट बोलून, एकमेकांची निंदानालस्ती करुन, द्वेष-मत्सर करुन, राग राग करून, सतशुध्द भक्ताच्या विरोधात जाऊन अशाने तो भगवंत मिळेल का?
गुरुबंधूं भगिनींचे नाते फार कोवळे आणि नाजूक आहे. हे एकाच मालकांचे, सद्गुरुंचे कुटुंब आहे. आपण सर्व एकाच पित्याची लेकरे आहोत, अशा तऱ्हेने वर्तणुक ठेवली पाहिजे. एका मातेच्या लेकराप्रमाणे वर्तणुक ठेवली पाहिजे. गुरुबंधू भगिनींचे नाते हे असे आहे की, ते आपणाजवळ काहीही मागणार नाही. फक्त ते तुमचे शुद्ध प्रेम आणि आपुलकी मागणार, माया, ममता मागणार.
आपला भक्त कसा आहे, कसा नाही हे सद्गुरु पाहत असतात, म्हणून शुद्ध स्फटिका सारखी वर्तणूक ठेवा. या संदेशाप्रमाणे चला. जे महान तत्व, अखंड नाम आपणास दिले आहे, त्याचा उजाळा करा. हेच संदेश आहेत. ©️