दैविक शक्ती पेक्षा मनाची शक्ती फार मोठी आहे. कर्तव्य करीत रहा. फळ देणे घेणे स्वतःच्या आधीन नाही. केव्हां मिळेल याचा थांग लागणार नाही. उपाधी निर्माण होते. त्यावेळी नामाचा जो अमूल्य पेला आहे तो घेत रहा. निसर्गाला सुद्धा नियम आहे. प्रसंगाच्या वेळी मात्र मालिक आठवतात. इतर वेळी मालिक कोठे असतात? आताच या ठिकाणी सांगितले आहे, आपल्याकडे जो अमूल्य पेला आहे, तो घेऊ शकता.
ज्यावेळी सेवेकरी आडमार्गाने जातो, त्यावेळी लीला करावी लागते. सेवेकऱ्याला मारण्यासाठी नाही, तर सन्मार्गाला लावण्यासाठी होते. लीला केल्यानंतर तो सद्गुरु चरणांजवळ येत असतो. त्यावेळी त्याला आठवण होत असते. साध्या भोळ्या ज्योतीवर लीला होत नाही. मालिक तारक आहेत, मारक नाहीत. सर्वस्व चरणांवर समर्पित करा, म्हणजे काहीही यातना होणार नाहीत. सद्गुरु तत्वाची कोणीही ओळख करून घेतली नाही.
भक्ती मार्ग सोपा आणि साधा आहे. या मार्गाने कोणालाही जाता येते. सतमार्गाने सत बीजारोपण होते. झाड लावण्यासाठी बीज एकच असते. एकानेच लावायचे. त्याची जोपासना करण्यासाठी अनेकांनी सहाय्य करायचे असते. मग ते भरभराटीला आल्यानंतर त्याची फळे अनेकांना चाखावयास मिळतात.
त्याचप्रमाणे नाम हेच बीजारोपण आहे आणि भक्ती हे झाड आहे. या भक्तीने त्याची जोपासना होते. आणि त्या ठिकाणी तन वाढले म्हणजे जोपासना न होता तेच भक्ती रुपी झाड कमकुवत होते. मनाची भावना ठाम पाहिजे. जे तन होतात ते काढून टाकावयास पाहिजेत.
सत् मार्गाने, सत् आचरणाने, सत् भक्ती युक्त अंत: करणाने ते तन काढून टाकावयास पाहिजे. मनाची शुद्धता झाल्यानंतर सत् मार्ग दिसतो. अशा तऱ्हेने जो जातो, तिच सहज समाधी होय. ©️