श्री प्रभू रामचंद्र म्हणतात, “या दरबारात किती वेळा येणे झाले आहे. महाराष्ट्र भूमी बद्दल पुढे ते म्हणतात, “कोपिष्ट मुनींच्या (विश्वामित्रांच्या) शापाने ग्रासलेली व शापदग्ध झालेली आपली ही भूमी आहे. आपल्या ह्या महाराष्ट्र भूमीला मुक्त करण्याचे महान कार्य या दरबारात सुरू झालेले आहे आणि आता ते सफलही होत आहे, हे पाहून आनंद होत आहे. या कार्यामुळे कितीतरी ऋषीकुळांची मुक्तता झाली आहे आणि याचसाठी ओंकारांचे 26 वे अवतार कार्य निर्माण झालेले आहे.
पुढे ते म्हणतात,”ज्या ज्या वेळेला सत्याचा लोप होऊन असत्याचा पगडा सर्वस्वांवर बसतो, त्या त्या वेळेला अवतार कार्य नटवण्यात येते आणि केवळ असत्याच्या नाशासाठीच अवतार कार्य घ्यावे लागते. त्याच तऱ्हेचे अवतार कार्य या कलियुगांत सध्या चालू आहे. प्रत्येक अवतार कार्यात सत् टिकविणे आणि असताचा नाश करणे, असताला नष्ट करणे या साठीच हे अवतार कार्य असते.”
“ज्या ज्या वेळेला अवतार घेतले, त्या त्या वेळेला आम्ही प्रत्यक्ष स्थुलात होतो. म्हणजेच स्थुलाने कार्यरत होतो. परंतु आता या युगात हे कार्य अदृश्य तऱ्हेने होत आहे. हे जरी खरे असले तरी हे कार्य होत असताना फार उज्वल तऱ्हेने होत आहे. आनंद आहे. किती महान कार्य आहे. किती ऋषी कुळे मुक्त करण्यात आली आहेत !”
(अर्थात यापूर्वी घेण्यात आलेली अवतार कार्ये ही स्थुलाने घडविली गेली होती. याचाच अर्थ, स्थुल स्थुलाला दृश्य तऱ्हेने सामोरे जात होते, वध करीत होते. या उलट, सद्य: स्थितीमध्ये अवतार कार्य जरी स्थुलाने नटविलेले असले तरीही, कार्य मात्र अदृश्य स्थितीने होत आहे. म्हणजे स्थुल जरी कार्य करीत असले, तरी ते स्थुलावर शस्त्रास्त्रांचा आघात न करता, अदृश्य गतीने ते कार्य करीत आहे व असताचे उच्चाटन करीत आहे. नाश करीत आहे.)
पुढे श्री प्रभू रामचंद्र म्हणतात, “या अवतार कार्यात महान कार्य करावयाचे आहे ते म्हणजे “भारत भूमीची मुक्तता !” हे श्रेष्ठ कार्य चालू आहे. असत्याचा नाश करून, सत् टिकविण्यासाठीच हे अवतार कार्य आहे आणि त्याप्रमाणे हे अवतार कार्य सुरू आहे.”
पुढे ते स्पष्टपणे उच्चारण करताना म्हणतात, “त्याच्याही पेक्षा, हल्ली म्हणजे आता, जे अवतार कार्य सुरू आहे, (आपल्या श्री सद्गुरु माऊलींचे २६ वे अवतार कार्य) ते फार श्रेष्ठ दर्जाचे आहे.
हल्लीचा मानव मायावी जाळ्यात गुरफटलेला आहे. ते जाळे तोडून त्यांना पलीकडे न्यावयाचे आहे आणि हे महान कार्य देखील चालू आहे. ज्यांना हे कळले नाही, ते पूर्णपणे मायावी जाळ्यात गुरफटलेले आहेत. त्यांना सत म्हणजे काय हे कळत नाही. ज्यांना कळले, ते सताच्याच आणि सत्याच्याच पाठीमागे जातात.
“सत् टिकविण्यासाठी लाघव करूनच कार्य करावयाचे असते. मानवाचे मानवत्व टिकविण्यासाठी कोणत्याही तऱ्हेचे लाघव करून, मानवत्व व सत् सिद्ध करावयाचे आहे. ©️
(समाप्त)