गुरू म्हणून शरण आलात, मग ती सद्गुरु माऊली कशीही असो, आसनावर बसलेली आहे, त्यांना जे पूज्य मानतील त्याच सेवेकऱ्याना त्यांची ओळख पटेल आणि जर जर का तो तेथे चोखाळा करीत राहिला, तर मात्र त्याचाच चोखाळा होईल.
ज्या मानवाला, तू मानव आहेस की, कोण आहेस याची ओळख ज्या व्यक्तीने करून दिली, त्याला खालीवर पाहणे, त्याचा कस घेणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य नव्हें. जर का त्याने असे केले, तर तो स्वतः त्यात फसेल आणि जो काहीही होवो, कसेही होवो, परंतु जो त्या ठिकाणी शरण आहे व त्या स्थानाला पूज्य व पवित्र मानेल, अशा व्यक्तीला वाटेल तेव्हढा त्रास झाला तरी त्यातून तो पार पडणारच म्हणून समजा वा पार पडलाच म्हणून समजा. त्याला कशाचीही भिती नाही. याच्या पलीकडे काय सांगू?
मानव हा संशयी आहे. मग त्याला खरे वाटणे फारच कठीण आहे. पावलो पावली मनाची चंचलता, बुद्धीमत्ता पालटते. दृष्टी दाही दिशा फिरते. दृष्टी समोर नजरेस पडेल, तेच त्याला खरे वाटते. पण जे कधी दिसत नाही, पाहण्यात नाही, पाहू शकत नाही, पाहणार नाही ते त्याला सत्य वाटणे अशक्य आहे. त्याला ते करता येणार नाही. करणार नाही. करू शकणार नाही. फक्त वरपांगी ढोंग करण्याचा प्रयत्न करीत राहिल. त्याला अर्थ नाही.(समाप्त) ©️