श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत, योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? सत् भक्तांच्या ठिकाणी मी असतो, तेथेच का असतो? भक्त सद्गुरु चरणांत तादाम्य झाल्यानंतर, मी त्या ठिकाणी उभा असतो, कारण ती भक्ती निष्काम असते. फक्त त्या ठिकाणी दर्शनाचीच इच्छा असते अन् म्हणून त्या ठिकाणी मी जातो.
मी योग्यांच्या ठिकाणी सापडत नाही, कारण योगी हे साधना साध्य करून घेण्याचे मार्गात असतात. त्यांचे ठिकाणी चमत्कार, नमस्कार असतात. मग योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ? योग्याला मी सापडलो असतो, तर तो चमत्काराचे आधीन गेला नसता. त्याला सत काय आहे हे कळलेले नाही.
आदीअंतापासूनचे संदेश आहेत की मी प्रणवातीत आहे. मग योग्याला प्राणायाम करण्याची आवश्यकता काय? भक्त त्या प्रणवातच निमग्न होतो तो प्रणव येतो कुठून? अन् जातो कोठे? तेच ते वैकुंठ ! ज्या ठिकाणी रमणीय स्थान, शांत ठिकाण, त्याच ठिकाणी मी स्थिर असतो. ते वैकुंठ ज्याने साधले, तोच खरा श्रेष्ठ भक्त होय. तेव्हा अखंड नाम, तोच प्रणव ज्या ठिकाणी स्थिर होतो तेच वैकुंठ !!
लाघवी तो मीच आहे. सूत्रे हलविणारा मीच आहे, पण याचा शोध घ्यावयास पाहिजे. मानव अनेक दृष्टीने पाहून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वाटेल ते करतो. यात आसन, आसनाधीस्त शंकाकुल राहू शकत नाही.
या ठिकाणी ज्ञान म्हणजे प्रकाश आहे. ते कुठे आहे, कोठे नेते हे मिळविण्यासाठी ज्योती त्या तऱ्हेच्या पाहिजेत. अजून बाहेर ज्योती रखडत आहेत. त्या पुढे येतीलच. या ठिकाणी आहे ते दुसऱ्या ठिकाणी नाही. कर्तव्याची तऱ्हा ज्या तऱ्हेची त्याप्रमाणे कर्तव्य करून घ्यावे लागते. (समाप्त) ©️
