स्वर्गातील देव जे आहेत ते सुद्धा मानव जन्म मागतात. म्हणजे मानव देह किती मोलाचा आहे. मानव मनावर हे पटवून घेत नसल्यामुळे ही स्थित्यंतरे घडत असतात. अशातून पूर्व संचितानुसार ऋणानुबंधांच्या दृष्टीने जी सांगड घातलेली आहे अर्थात त्याला आपण दीक्षा म्हणतो, अनुग्रह म्हणून गणला जातो. ही जाणीव झाल्यानंतर त्याने बिलकुल विसरता कामा नये. ही जाणीव ठेवून ज्योत वाटचाल करील तर त्याला अडचण भासणार नाही. प्रसंग निर्माण होणार नाहीत. होऊ देणार नाहीत. त्या मार्गाने ज्योत जाईल तर ! नाही पेक्षा गायीच्या कासेला गोचीड म्हणून ज्योत असते. त्याला कशाची चटक असते? अमृत दूर नसते, पण त्याला रक्ताची चटक असते. अशा तऱ्हेने मायेच्या अनुसंधनाने वागू लागला की गोचडी सारखी स्थिती होऊन वहावला जातो.
मानव योग्य परिस्थितीने वागल्यास मी दूर नाही. जवळच आहे. पाहून घे ! मी तुझ्यातच आहे. परंतु पाहणारा पाहिजे. ज्याने अनुभव घेतला, ठासून सांगितले, “तुझे आहे तुज पाशी । परंतु जागा चुकलासी ।“ हे सांगण्याचे तात्पर्य एवढीच की, येथे येणाऱ्या ज्योती निष्काळजी असाव्यात. त्यांच्या पाठिशी फिकीर असू नये. हाच मुद्दा आहे. असे असताना येथे येणाऱ्या ज्योती काळजी मध्ये का असतात? प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक सेवेकऱ्याने यावर विचार करावा. वाईट करत असताना चांगले होत नाही. मग चांगले करीत असताना वाईट होणार नाही. चांगले करीत असताना अडचणी निर्माण होत असतात. याचे कारण प्रारब्ध ! म्हणून जे असते ते त्या ठिकाणी उभे राहते. ते कोणालाही सुटलेले नाही. सुटत नाही. परंतु जे सताच्या मार्गाला लागले, ते प्रारब्धाला थारा देत नाहीत. देऊ शकत नाहीत. (पुढे सुरु…३)©️