सूक्ष्म याचा अर्थ ज्योत ज्या स्थितीत जाते तीच धारणा होते. याला सूक्ष्म म्हणतात. म्हणून जे आपणाला मिळवावयाचे ते जडत्वापासूनच मिळते. स्थुल भक्तीच्या अनुसंधनाने भक्त सद्गुरुना डोळे भरून पाहू शकतो. स्थुलात जर सद्गुरु दर्शन मिळाले नाही तर सूक्ष्म निरर्थक आहे. म्हणून स्थुल श्रेष्ठ आहे. स्थुल हे स्थुलाच्या गतीने म्हणजे सद्गुरु गतीने वाटचाल करीत स्थिर होते. पण स्थुल स्थिर पाहिजे. दहाही इंद्रिये स्थिर राहतील तरच स्थुल स्थिर राहील. मन नाममय होईल त्याचवेळेला हे शक्य आहे. मन हे नाममय असेल तर मोक्षमुक्ती दूर नाही. म्हणून नाम श्रेष्ठ आहे. सद्गुरु आपल्या ऋणातून मुक्त होतात. पण टिकविणे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे.
जडत्व श्रेष्ठ केव्हा? तर या चाकोरीतून वाटचाल करील तेव्हा. म्हणून हे सर्वस्व स्थुलात म्हणजे मानव योनीतच होऊ शकते. पण जाणले तर ! मानव हा देव पण आहे आणि राक्षस पण आहे. महत्त्वकांक्षा असावी. जडत्व खरे पण जसे मुशीत घालाल तसे ते होते. चांगल्या मुशीत घातले तर चांगले, वाईट मुशीत घातले तर वाईट बनते.
ज्यांना अखंड नाम बहाल केले आहे, त्यांनी तरी आपली पातळी सुधारली पाहिजे. जडत्व म्हणजे जन्म घेणे हि धारणा आहे. धर्माची व्याख्या – “धारणा, पोषण आणि कर्तव्य !“
मालिक – मानव हा निर्माण केला आहे. मानवाला मानव धर्म पार पाडण्यासाठी जी कर्तव्ये निर्माण केली आहेत, त्यात धारणा, पोषण आणि कर्तव्य हे जे नियम, हाच धर्म होय. ज्या जगतनियंत्याने मानव निर्माण केला, त्या जगतनियंत्याला पाहण्यासाठी जे नियम केले तोच धर्म होय !
जगाच्या पाठीवर निर्मितीच्या वेळी दोन्हीही वर्ण आर्य आणि अनार्य हे नव्हते. मात्र काही मानव निर्माण झाल्यापासून सुधारनेने गेले ते आर्य झाले आणि जे जंगली स्थितीत राहिले ते अनार्य झाले. त्यांना धारणा, पोषण आणि कर्तव्य यांचे ज्ञान नव्हते. ते अडाणी असे मानव होते.
काही मानवांनी आपल्या कर्माप्रमाणे वाटचाल करून आपल्यात सुधारणा केली ते आर्य आणि ज्यांना ही गती नाही ते अनार्य होत ! हे दोनच वर्ण वावरत होते. जे आर्य म्हणून होते त्यांनी सुधारणा करत करत जगतनियंत्याला पाहण्यासाठी जे नियम केले, त्या नियमात वाटचाल केली तो आर्यधर्म होय. तो सर्व मानवात होता. तोच आर्यधर्म पूर्वापार चालत आलेला आहे आणि पूर्वीपासून निर्माण झालेला आहे. काही मानवाना हे पसंत नाही. कोणत्या योगाने मानव हा स्थिर होईल म्हणून त्यांनी जगतनियंत्याला आळविले. त्याप्रमाणे ‘उपदेशक’ निर्माण झाले. त्यांनी आपल्यासाठी धर्म निर्माण केले. ते इतर धर्म आहेत. पण या सर्व आर्यवर्ताच्या शाखा आहेत. पण धर्म आर्य म्हणजेच हिंदू धर्म आहे. आर्यधर्मच त्या स्थितीतून निर्माण झालेला आहे. (समाप्त) ©️