सत्संग असला तर त्यापासून सत् चाकोरी निर्माण होते. यावेळेला मनाला स्थिरता प्राप्त होते, ती कला अनुसरून त्याप्रमाणे वाटचाल करा. मनाला जेणेकरून स्थिरता प्राप्त होईल त्याप्रमाणे वागा ! ते मन कशाने स्थिर होईल? तर सत्संगाने ! ज्यापासून मनाला नेहमी स्थिरता प्राप्त होते, शांती मिळते त्याला सत्संग म्हणतात. मन व जड हे एकमेकांना बांधील आहेत. जडात बहात्तर हजार नाड्या असून, तूर्या सर्वांवर ताबा ठेवते. ती अविनाशी आत्म्याच्या अधिन आहे. तेव्हा ही माहिती मिळविण्यासाठी सत् शुद्ध मार्गाने गेले पाहिजे. जडत्वाशिवाय आसन योग सिद्ध होणार नाही. तेव्हा जड हे स्थिर झाले पाहिजे. तुम्ही गेलात तर सर्वस्व प्राप्त होईल. स्थुलामध्ये सर्वस्व ब्रम्हांड सामावलेले आहे.
योग म्हणजे प्रणव स्थिर करणे. मन स्थिर झाल्याशिवाय प्रणव स्थिर होणार नाही. देह झिजवलात तर चंदनासारखा सुगंध सुटेल. आपणाला जे मिळवावयाचे ते याच योनीत मिळवू शकता. मानव जन्मात स्थिरता मिळेल. इतर जन्मात मिळू शकणार नाही, म्हणून मानव जन्माची आवश्यकता आहे. दैवत योनीला स्थूल दर्शन होणे कठीण आहे. सुक्ष्माला सद्गुरू सानिध्य मिळणे कठीण आहे. स्थुल स्थुला जवळ येऊ शकते, विचारू शकते, स्थिर होऊ शकते. अखंड नाम मिळू शकते. म्हणजे स्थुल स्थुला जवळ येऊनच हे सर्वस्व मिळते. म्हणून स्थुल श्रेष्ठ आहे. ©️