गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: ! गुरु: साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः !!
ॐ नमोजी सद्गुरू परब्रह्म ! ॐ श्री गुरुदेव दत्त ! अशा श्री सद्गुरूंना समस्त गुरुबंधू भगिनींचे शतशः प्रणाम !!
शुभ दिन म्हटले की भक्तांना एक पर्वणीच असते. मे महिना हा त्यातीलच एक खास मास ! या मासामध्ये आपल्या आश्रमाचे एकूण तीन कार्यक्रम आनंदाने उत्साहाने पार पडत असतात ही सद्गुरु माऊलींचीच कृपा होय.
प्रथमचा ९ मे रोजी येणारा आपल्या सद्गुरु माऊलींचा पुण्यस्मरण दिन ! त्यापाठोपाठ असतो तो इंगळेवाडी आश्रम, सातारा येथील भंडारा शुभ दिन आणि लागोपाठ येणारा आपला वालावल, कोकण आश्रम भंडारा शुभ दिन !!!
बाहेर कडाक्याचा उन्हाळा आणि आश्रमांमध्ये शितल शांत वातावरण यांचा संगम होऊन हे दिन साजरे होत असतात. हे जरी खरे असले तरी कार्यक्रम अति उत्साहाने साजरे होत असताना श्री सद्गुरु माऊलींच्या आशिर्वादामुळे ते तसेच निर्विघ्नपणे, कोणतीही अडीअडचण न येता पार पडत असतात. तसेच ते यंदाही श्री सद्गुरु माऊली कृपेकरून निर्विघ्नपणे पार पडलेले आहेत. फक्त गालबोट लागले ते वालावल कोकण आश्रमात !
पहिली पंगत सुरु असतानाच, एकाएकी सोसाट्याचा वारा सुटला आणि कृष्ण जन्माच्या वेळी जसे काळोखे वातावरण, जलधारांचा वर्षाव व दामिनीचा चमचमता फटकार वर्णिला होता, तशी क्षणार्धात परिस्थिती आश्रम परिसरात निर्माण झाली. कोणास काय होते आहे हे कळण्याच्या आधीच सौदामिनीने परिसरात धुमाकूळ माजवला.
आश्रमात अगोदर पासूनच जनित्राचा वापर सुरु असल्या कारणाने अंधाराचे साम्राज्य नव्हते. हे जरी खरे असले, तरी आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात विजेचा मागमुसही नव्हता. या संपूर्ण अंधाराच्या काळोख्या साम्राज्यात आश्रम मात्र ध्रुव ताऱ्यागत अढळपदाने अक्षरशः प्रकाशात न्हाऊन निघाला होता.
नंतर श्री सद्गुरु माऊलींच्या आदेशानुसार योगीनी बाहेर आल्यावर व काही अवधी तेथेच संदेशाचे देवाणघेवाण करीत उभी राहिल्यानंतर सर्वस्व परिस्थिती पुन्हा एकदा श्री सदगुरू माऊली कृपेने शांत झाली व श्री सद्गुरु भंडारा दिनाचा कार्यक्रम श्री सद्गुरु माऊलींच्या कृपाशिर्वादामुळे निर्विघ्नपणे पार पडला.
©️त्यातील काही क्षणचित्रे आपल्या अवलोकनार्थ –