सर्व ठिकाणी व्यापक, सर्व भूतेषु मी आहे, हे ज्याने ओळखले, जाणले तो सेवेकरी कसा असेल? माझ्याशी कोण बोलतो त्याची तो विवंचना करील. जडत्व मानव बोलतो आहे का? कोण बोलतो आहे? सर्व व्यापक, सर्व भूतेषु मी आहे हे जर जाणले, तर त्या पात्रतेची उत्तरे तो देऊ शकतो.
मातीचे ढेकुळ पाण्यात विरघळते, त्याप्रमाणे सेवेकरी पाण्यासारखा कधी होईल? याची अपेक्षा करावी का? असा आदर्श सेवेकरी बनला, मग मात्र जो बीजदाता निर्माण करणारा, बीजात बीज उत्पन्न करणारा कोण त्याचा शोध घेईल. असा जर बीज निर्माण करणाऱ्याचा पाठलाग केला, तर तो सापडेल. पण कसा सापडेल? माझे तुझे केल्यावर सापडेल का? सेवेकर्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे, हे जर ओळखले, तर कोणते प्रणव निघतील? कोण बोलतो आहे याचा विचार केला, तर त्या ठिकाणी कसे वागावे, याची खूणगाठ बांधावी, तरच बीजदाता हाताशी सापडेल. त्याची ओळख होईल. ओळख झाली नसती, तर तो या ठिकाणी रममाण झाला नसता. ओळखून सुद्धा पळवाट काढली, तर त्याचा अनुभव आपल्याला अवश्य मिळेल. अनुभव असून, ओळख असून, पळवाट काढली तर दोष कोणाचा? म्हणून पळवाट काढू नका.©️