श्री संत तुकाराम महाराज – मी महान नाही. मी कोणत्या गतीने महान आहे. गती देणारा घेणारा फार वेगळा आहे. तो पांडुरंग फार वेगळा आहे. त्यांचा कोणीही अंत लावलेला नाही अगर लावू शकणार नाहीत. माझ्यासारख्या पामराला महान म्हणणे बरोबर नाही. जे महान आहे तेच ते पांडुरंग फार निराळे आहेत. प्रणव देणारे अन घेणारे तेच आहेत. बोलविता धनी फार वेगळा आहे. आपल्याच कृपेने अमृतमय अभंगवाणी प्रसवली आहे.
नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची।।
नाम ! दोनच अक्षरे पण त्यात सर्व ब्रम्हांड भरलेले आहे. हे नाम किती साधे किती सोपे आहे, गोड आहे, अमृततुल्य आहे. ते घेण्यासाठी मनाची सतशुद्ध ठेवण पाहिजे, मग काहीही अवघड नाही. यासाठी वनात, गिरीकंदरी जाण्याची आवश्यकता नाही. घरी बसल्या सुद्धा नारायण धाव घेत असतो. त्या पांडुरंगाचा महिमा अगाध आहे. त्याला काही नको. फक्त मनाची एकाग्र स्थिती व सतशुद्ध ठेवण पाहिजे. मनाच्या सतशुद्ध भावनेने, एकाग्रतेने जर पांडुरंगाचा ठाव घेतला तर ते पांडुरंग घरी येतात. त्यांचा शोध घ्यावा लागत नाही. एकाच ठिकाणी बसून त्यांच्या ठिकाणी चित्त स्थिर केले तर ते घरी येत असतात. त्याचा ठाव घेण्यासाठी मन त्यांच्या चरणावर एकाग्र केले पाहिजे. एकच बीज म्हणजे नाम सर्वत्र विखुरले आहे. सर्वत्र शोधले ठाव घेतला पाहिजे तरी पण मन एकाग्र केल्यानंतर ते आपणातच प्रगट आहे याचा प्रत्यय येतो. असा नामाचा महिमा अगाध अन मोठा आहे ज्याला याचे वर्म मिळाले तो पांडुरंगमय होतो. (पुढे सुरु….२)©️