श्री समर्थ मालिक – देवाचे सख्यत्वासाठी | पडाव्या जिवलगांसी तुटी ||सर्व अर्पावे शेवटी | प्राण तोही वेचावा || (दास.४.८.८)
एकाच्याच ध्यानासाठी, एकाच्याच नामासाठी, एकाच्याच सख्यत्वासाठी ते कसे करावयाचे? त्यांना आपलेसे कसे करावयाचे? हे जर सापडले, तर हेवेदावे, मदमस्तर निर्माण होईल का? एकाच तत्त्वावर ठाम राहिला तर भटकण्याची आवश्यकता काय? ज्योतिष, राशिभविष्य पाहण्याची काय आवश्यकता?
एका समर्थांच्या ठिकाणी दृढ: भाव, ठाम श्रद्धा वाहिल्यानंतर बाकी काही उरेल का? एकाचे सख्यत्वासाठी सर्वस्व अर्पण केल्यानंतर, मन दुसरीकडे धावणार नाही, जाणार नाही. वर्मच पाहिल्यानंतर त्याचे मन दुसरीकडे जाणार नाही. मग मात्र प्राण त्या ठिकाणी अर्पण केलेला दिसून येतो. दृढ:निश्चय, ठाम श्रद्धा, यामुळे त्याचा प्राण अगोदरच अर्पण केलेला असतो. बरं, प्राण अर्पण केलेला आहे हे कशावरून ओळखायचे? प्राण अर्पण केला आहे असे म्हटले म्हणजे होते का? प्राण अर्पण केलेल्याची भावना ओळखून येते. असेच जर असेल तर इतर मानवांना कळून येते. तेव्हा तन मन धन हे सर्वच व त्याने अर्पण केल्यानंतर मग बाकी उरले काय? आता ही तिन्ही तत्त्वे कशावर चालली आहेत? कोणाच्या सत्तेने चालली आहेत? ©️
