आपला मार्ग कोणता? नाम कोणी दिले? कोणाच्या नामात दंग? ते सद्गुरू कोणते? याची पाहणी करण्याकरीता त्यांच्यात दंग असावयास पाहिजे. मालिक जाणीव देतात. पण सेवेकरी ऐकत नाही.
मालिक सांगतात ते हिताचेच सांगतात, मग सेवेकऱ्याने असे कां करावे? माया सर्वांना आहे. ज्याच्या पाठीशी अखंड तत्व, त्याला माया काय करणार आहे? ज्याच्या पाठीशी (ते) नाहीत, त्याला माया कबजा करते. आचार, विचार, कृती सर्वस्व सत् मनानें शुद्ध असल्यावर मायेचे काही चालत नाही. मग सर्वस्व शुध्दच राहते. जरा अशुद्धपणा आला, मनानें गढूळ झाला, तर सर्वस्व गढूळ होते.
आपणाला पुष्कळ वेळा सांगितले आहे की, दिवसातून तीन वेळा मालकांची फेरी असते. काहींच्या घरी वादविवाद चालू असतात. मालकांना त्याठिकाणी थांबावे असे वाटत नाही. ते कां? मग, तू आणि अहंपणा यांच्यामुळे कां? तू काय बरोबर घेऊन आला आहेस? तर गेल्या जन्मांचे संचित! मग माझे तुझे कां म्हणावे? हे कोणाचे आहे?
हा संसार सद्गुरुंचा आहे. सर्व त्रिभुवनाचा संसार एका ठिकाणी बसून पहात असतात. हे सेवेकऱ्यांनी समजावयास पाहिजे. संसाराला रित पध्दत असते. संसाराची दोन्ही चाके सरळ असतील, वरचे सामान सरळ असेल, तर संसार गाडा सुरळीत चालेल. तिचे चाक सरळ नसल्यास संसार गाडा डळमळीत होऊन सामान पडून जाईल. हे समजावयास पाहिजे. माझे तुझे काय आहे? काय बरोबर नेणार आहे? काय घेऊन जाणार आहे? ते सेवेकऱ्यांनी समजावयास पाहिजे. कांहीना हे समजत नाही. वाटेल तसे, वाटेल त्यावेळी स्वतःशी व इतरांशी बडबडतात. सेवेकरी काय करतात? सांगितले काय आणि सेवेकरी करतात काय? मालिक म्हणतात, करतो तर करु द्या ! सांगून ऐकत नाही. त्यांचे कर्मसंचित तो भोगील. (Contd.3)©️