श्री समर्थ मालिक – मानव कसा चालला आहे हे आपण पाहतोच आहोत. म्हणतो, बिचारे पशुपक्षी यांनी काय केले आहे? परंतु पशुपक्षी यांचे जरी हाल झाले तरी त्यांना देहात कुठपर्यंत ठेवायचे? त्यांना कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने मोकळीकता करावयास हवी.
अदृष्य शुद्धीकरण जे आहे ते थोडेसे आहे. अखेर अखेर संपूर्ण झाल्यानंतर या भारत भूमीचे आणि महाराष्ट्राचे शुद्ध व पवित्र देशात रूपांतर करावे लागेल. मग आपणास सुख सोहळा पहावयास मिळेल. म्हणजे सर्वस्व संपले. अघोरांची घुसळण झाल्यानंतर भूमी शुद्ध करण्यास वेळ नाही. भूमी शुद्ध झाली की उ:षापाचे काय करायचे ते आपणास माहित आहे. सर्वस्वांना बोलावून हे प्रणव का व कशासाठी बाहेर पडले ते दोघांना विचारावयाचे आहे. मग दोघांचेही बोल ऐकावयास मिळतील. तदनंतर शापातून मुक्तता होईल. म्हणून तो काळ आता अगदी समीप आला आहे.
जस जसा काळ समीप येईल, तस तसा मानवांना त्रास होण्याचा संभव आहे. तरीपण सेवेकर्यांनी धीर सोडता कामा नये. आपल्या कर्तव्यात जागृत राहणे. रामावताराच्या वेळी मानवांची बुद्धी व कृती ज्या गतीची होती त्याप्रमाणे माझी तऱ्हा होती. त्यावेळेला एक बोल एक वचन अशी तऱ्हा होती. पण तदनंतर काळ बदलला. कृष्णावताराच्या वेळी काळ कसा होता? याची टोपी त्याला, त्याची टोपी याला. हे कोणासाठी केले? भारतात सगळेच भक्त होते. कंस हा भक्तच होता. त्याच्या सानिध्यात भक्तच होते. वासुदेव देवकी हे सुद्धा भक्त होते. मग यांना वाचवून कंसाचा नाश करण्याची काय आवश्यकता होती?म्हणून ज्या ठिकाणी सतशुद्ध भक्ती असते, तेथे मला काही करता येत नाही. सत् असून सुद्धा अधोगतीला गेल्यानंतर नजर फिरवावी लागते.
अवतार कार्य केंव्हा, कधी आणि कोणत्या गतीत होते? या भारत भूमीमध्ये अतिशयोक्ती झाल्यानंतर अघोरांचा नि:पात करण्यासाठी काही काळवेळ नसते. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. सूक्ष्माचे कर्तव्य आहे, तेच फार महान कर्तव्य आहे. कारण या दंडकारण्यातील मानवांना या अघोरी तत्त्वांनी आपलेसे करून घेतलेले आहेत. अशांची सुधारणा कोणत्या तऱ्हेने करावी हे सांगण्याची आवश्यकता नाही. पूर्णत्व भरल्याशिवाय हात घालता येत नाही. अशा अघोरांना आपण स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. हे कसे होते आहे हे आपण पहात राहणे. जे शुद्धीवर येणारे असतील, ते येतील, पण ज्यांच्या भाग्यात नाही ते केव्हाही शुद्धीवर येणार नाहीत. ©️
