चौकट मुनी – म्हणजेच अगस्त्य किंवा अगस्ती मुनी ! ते म्हणतात, “ज्या अमुल्य क्षणांची मी वाट पहात होतो, तो क्षण आज मला लाभला. धन्य झालो.”
दोन हजार वर्षांपूर्वी कुपीच्या डोंगराच्या पायथ्याशी, एक गुहा आहे, त्या ठिकाणी एका वृक्षाखाली ध्यानस्थ असताना, सद्गुरु माऊलींचे एकदा दर्शन लाभले. त्यावेळेला दिलेल्या आदेशाला आज पूर्तता आली.
(वालावल व चेंदवण या दोन गावांच्या सीमेवर, डोंगरात हे ठिकाण स्थित आहे. यालाच कुपीचा डोंगर नावाने ओळखले जाते. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या शिखरावर एक वडाचे झाड आहे व त्याच्या मुळाशी एक चिंचोळे असे आतील बाजूने खबदाड आहे. या येथेच कोठेतरी गुहा प्रवेशद्वार असून, श्री अगस्त्य मुनी म्हणतात, त्याप्रमाणे गुहेमध्ये जाता येते असे म्हटले जाते.)
(येथे चौकट मुनी अर्थात अगस्त्य मुनी आपणा स्वतःबद्दल माहिती देताना सांगताहेत, “कुपीच्या डोंगरातील ह्याच स्थानी ते ध्यानस्थ बसले असताना श्री सदगुरू माऊलींनी त्यांना दर्शन दिले होते व आदेशही दिला होता की,) “दोन हजार वर्षांनंतर त्रिभुवन शक्ती निर्माण होणार आहे, ज्याप्रमाणे सूर्य उगवला म्हणजे अंधार नाहीसा होवून, सर्वत्र प्रकाशमय होते, त्याप्रमाणे राक्षसांचा निःपात होऊन, या भूमीचा उद्धार होणार आहे.”
त्या आदेशाप्रमाणे, त्रिभुवन शक्तीची वाट पहात होतो. ज्या सद्गुरु माऊलींच्या दर्शनाची तहान लागली व अत्यंत आतुर झालो होतो, ते दर्शन प्रत्यक्ष आज मिळाले. (दोन हजार वर्षांपूर्वीच्या आदेशाप्रमाणे पुन्हा एकदा त्यांना कलियुगातील सताच्या ह्या २६ व्या अवतार कार्या दरम्यान दर्शन प्राप्त झाले. सताने दर्शन दिले. ज्या दर्शनाने ते धन्य आणि पावन झाले.)
त्या क्षणी जे दर्शन, त्याच स्थितीत अखंड दर्शन, त्याच क्षणाचे दर्शन आज प्रत्यक्ष मिळाले. सर्वस्व सार्थक झाले. त्याच अखंड दर्शनात निमग्न रहावे हिच इच्छा आहे.
या सर्वस्व माहिती वरुन आपणांस कोणता बोध होतो, तर आपले श्री सदगुरू, हे जरी आपण मानवतेत आपले बाबा म्हणून पहात असलो, तरी ते त्या युगातही होते व आजही आहेत व पुढेही असणार आहेत. मग आपण समस्त भक्तगणांनी ह्याची जाण ठेवून मार्गक्रमणा करावयास हवी की नको? जर हवी म्हणावे, तर मग आपण त्यांच्या घालून दिलेल्या मार्गावरून, त्यांच्या शिकवणीनुसार मार्गस्थ होणे नितांत गरजेचे आहे. त्यासाठी आचार, विचार, उच्चार सत् शुध्द, निर्विकल्प, निर्विकार, आनंदमयी, प्रेम भावनेने युक्त ठेवून, सत् मार्गाने मार्गस्थ होऊया आणि सताचे नामस्मरण करु या !!! ©️