आपले गुरु कोण? त्यांना कोणत्या तऱ्हेने कोणत्या मार्गाने पहावे. ते पहाण्यासाठी प्रत्येक मानवाने धडपड नको का करायला? ज्याला शरण, ज्यांनी अखण्ड नामाचा ध्वनी दिला, ज्यांचा शिरी हस्त पडला, तेच आपले मालिक, तेच आपले सदगुरू होय. ते पहाण्यासाठी धडपड करा. म्हणजेच मुक्तीचा मार्ग सापडेल. नाहीतर नाही.
भक्ती सोपी तितकी कठीण आहे. भक्ती सोपी कोणाला व कठीण कोणाला? जो सेवेकरी, सर्वस्वी कृती शुद्ध, नामात तन्मय त्याला सदगुरू दर्शन लवकर व सहज मिळेल. थोडा जरी मायेत गुरफटला गेला, तरी सर्व फुकट जाते. काहीही होवो, गुरुंचे दर्शन घेणारच. अशी ज्याची ठाम श्रद्धा, अढळ नि:श्चय, तो दर्शन घेतो.
सेवेकरी म्हणतो, मी शुद्ध आहे. परंतु आतील डांबराचे डाग धुवून जाण्यास नामस्मरण करने अत्यंत जरुर आहे. सेवेकरी म्हणजेच सदगुरू होय. तो कसा व कोणत्या रितीचा? ते पाहण्याची प्रत्येकाने धडपड करा. जे प्रत्यक्ष गुरु, तेच उपदेश सांगतात. ते स्थुलांगी मानव असले, तरी आतून कोणी पाहिले आहेत काय? त्यांचा अंत लावला आहे का? तो मिळेल, परंतु त्या रितीने सेवेकऱ्याने वागले पाहिजे. ज्याला गुरु दर्शन नाही, त्याला मोक्ष शेवटपर्यंत नाही. सेवेकरी कोणत्या पदाने असावा? आचार, विचार, वळणे कोणत्या तऱ्हेची असावीत? सेवेकरी सर्वच असतात, पण सेवेकरी तीनही अंगाने शरण जाईल, ज्याची सर्वस्व कृती सत्, तोच सेवेकरी होय. (समाप्त)©️