श्री समर्थ मालिक – एकमेक एकमेकांवर अवलंबून आहेत. आपण मानव आहात. संशयात, षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटले आहात. या सर्वस्वातून सुटका करणारे, एक महान श्रेष्ठ पद आहे. तेच हे गुरुपद आहे. त्या गुरुपदाशिवाय सेवेकऱ्यांना वाचविणारे, तारणारे, त्यांचे कोडकौतुक पुरविणारे दुसरे कोणीही नाही. सद्गुरु आणि सेवेकरी यांचे नाते संबंध फार निराळे आहेत, वेगळे आहेत. आपल्या सेवेकऱ्यांसाठी ते हेलावतात. लयबद्ध होतात. कोणालाही ते दूर लोटित नाहीत. असे हे पूर्णत्वाने दयाघन तत्व आहे. ही दया इतर ठिकाणी आढळणार नाही. सेवेकरी कोणत्याही तऱ्हेचा असो, तो सद्गुरुमय व्हावा अशी त्यांची आंतरिक तळमळ असते.
कर्तव्य केल्यानंतर मुक्ती आणि मोक्ष दूर नाही. आपण जाणते सेवेकरी आहात. ओळखण्याची खूण थोडी आहे, ती ज्याला मिळाली तो धन्य होय. ज्यांना मिळाली नाही, त्यांनाही ती मिळेल. पण हळूहळू कालांतराने.
हे सानिध्य मिळायला भाग्य लागते. सेवेकऱ्यांना सद्गुरु कधीही दूर लोटित नाहीत. दूर जाऊ देत नाहीत. असे हे दोन तत्त्वात भरलेले सद्गुरुपद, याचाच ठाव सेवेकर्यांनी घेणे. हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला सेवेकऱ्याला आपल्या अमृतमय वाणीने सिद्ध करण्यासाठी संदेश देत असतात. ते संदेश सेवेकऱ्यांनी पाळावयाचे असतात. या संदेशांना फार महत्त्व आहे. याचे निवेदन केलेले आहे. जरी सेवेकर्यांनी संदेश पाळले नाहीत, तरी सद्गुरु कोपिष्ट होणार नाहीत. त्याला गोड शब्दात समजावून सांगतील. ©️
