*गजेंद्र मोक्ष* या नावासंदर्भातील कथा प्रसिद्ध आहे.
हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ भागवत पुराणातील ८ व्या स्कंधातील हि एक पौराणिक आख्यायिका आहे.
गजेंद्रचा मागील जन्म –
गजेंद्र – त्याच्या मागील जन्मात, इंद्रद्युम्न नावाचा महान राजा होता. जो विष्णू भक्त होता. एके दिवशी, अगस्त्य ऋषी, या राजाला भेटायला येतात. परंतु राजा इंद्रद्युम्न (गजेंद्र), त्याला भेटायला आलेल्या ऋषीमुनींचा आदर न करता आपल्या आसनावरच बसून राहतो. या त्याच्या अहं वृत्तीमुळे, महान ऋषीवर अगस्त्य मुनींना राग येतो व ते त्याला शाप देतात. पुढील जन्म तुझा हत्तीच्या रूपात होईल.
आख्यायिका –
गजेंद्र नावाचा एक हत्ती होता, जो वरुणाने निर्माण केलेल्या ऋतूमत नावाच्या बागेत राहत होता. जी बाग त्रिकूट पर्वतावर वसलेली होती.
एके दिवशी नेहमीप्रमाणे तो विष्णूची प्रार्थना करण्यासाठी, कमळाची फुले घेण्यासाठी जवळच्या तलावावर गेला. तलावात राहणाऱ्या मगरीने अचानक गजेंद्रावर हल्ला केला आणि त्याचा पाय पकडला. गजेंद्रने मगरीच्या तावडीतून सुटण्याचा बराच प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी जीवाच्या आकांताने विष्णूचा धावा करण्यास सुरुवात केली.
आपल्या भक्ताची हाक व प्रार्थना ऐकून विष्णू घटनास्थळी धावले. आपल्या आराध्य दैवताला पाहून गजेंद्राने आपल्या सोंडेतील कमळ श्रीविष्णूंसाठी वर उचलले. हे पाहून श्री विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने मगरीचा शिरच्छेद केला.
या सर्व माहिती बरोबरच प्रतिकवाद सुद्धा या कथेतून प्रगट होतो. या कथेतील प्रतिकात्मक मूल्य काय सांगते? तर गजेंद्र हा मानव आहे. मगर हे पाप आहे आणि तलावातील गढूळ पाणी हा संसार आहे. *गजेंद्र मोक्षाचा* प्रतिकात्मक अर्थ असा की, भौतिक इच्छा, अज्ञान आणि पापे कर्माची अंतहीन शृंखला तयार करतात. गढूळ पाण्यात म्हणजेच संसारात अडकलेल्या असहाय्य अशा गजेंद्रला
अर्थात मानवाला, मगरीने म्हणजेच पापाने वेढले आहे. मानव अशा प्रकारे मृत्यू आणि पुन:र्जन्माच्या अखंड चक्रव्यूहात अडकलेला असतो आणि तो त्यातून तेव्हाच सुटतो, ज्यावेळेस भगवंत सहाय्य करायला येतात. ©️
(भाग एक समाप्त)