श्री समर्थ मालिक – प्रत्येकाला माहित आहे की कंस हा मामा असताना कसे कर्तव्य केले. कौरव, पांडव सुद्धा आप्तच होते. त्यांना फेकले नाही, पण त्यांनी जे वलय निर्माण केले ते तोडण्यासाठीच हे युद्ध घडविले. ज्या वेळेला मानव अघोरी कृत्याला बळी पडतो त्यावेळेला अवतार कार्य नटवून त्याचा नि:पात करावा लागतो.
आता सुद्धा हीच गती निर्माण झाली आहे. मानव हा पराकोटीला जाऊन, पूर्णत्वाने वासनेच्या आधीन गेला आहे. काळ समीप आला आहे. वेळ भरल्याशिवाय गती देता येणार नाही. निसर्गचक्र फिरणार आहे. स्थूलरुपी मानवाचा नि:पात होणार आहे. पण कधी हे सांगता येणार नाही. वेळ अगदी समीप आली आहे. कार्य करावयाचे आराखडे आधीच तयार असतात. स्थूलावरच आक्रमण होणार आहे. अगोदर निसर्गतऱ्हा, त्याने जर मानव शुद्धीवर आला नाही, तर प्रत्यक्ष मानवांचा उच्छेद करावा लागतो. निसर्ग तऱ्हा सुरू होईल. पुढे मानवाचा स्थूलांगी उच्छेद करण्याची चक्रे फिरू लागतील.
त्याप्रमाणे कलियुगात हेच आहे. ज्या वेळेला मानवांची त्राही, त्राही अशी स्थिती होते, त्यावेळेला सत तत्व जागृत होऊन असताचा नि:पात करण्याचे कर्तव्य पार पाडीत असते. अद्याप वेळ भरलेली नाही, थोडा अवधी आहे. ती वेळ आली की त्याप्रमाणे चक्रे फिरतील. प्रत्यक्ष स्थूलावर कर्तव्य करण्याची वेळ येणार आहे. आता जरी मानव जर्जर झाला असला तरी अजून पूर्णत्व गती झालेली नाही. ती वेळ आली की मग वेळ नाही. नि:पात होतो. प्रत्यक्ष स्थूलाने घटना घडते आहे. थोडासा अवधी आहे. सताला कोणीही बाधा देणार नाही. ©️
