सेवेकरी ज्यावेळेला शरण जातो, तो कोणाला शरण जातो? जे त्रिभुवन व्याप्त असून, अलिप्त आहेत, तेच आसनाधिस्त असून, त्यांनाच सेवेकरी शरण जातो. तेच ठिकाण परम शांतीचे माहेरघर, परमधाम, आश्रयस्थान, सर्व सुखांचे परमोच्च निदान आणि त्याच ठिकाणी शांतीही अखंड नांदत असते. तेच मोक्षाचे ठिकाण होय. तोच मोक्ष होय.
मग आसनाधिस्तानी सांगितल्याप्रमाणे वाटचाल करीत करीत मन एकदम शुद्ध स्फटीकासारखे झाले म्हणजे तिच माऊली जाणीव देत असते. तिच दाखवून देते की, तू आणि मी एकच आहे. पहा……. असे जर आहे की, त्याच ठिकाणी शरण जायचे, मग ही आरशाची छबी कशाला? आरसा कशाला? हि सोंग, ढोंग काय कामाची? छबीची, आरशाची, फोटोची, प्रतिमेची पूजा करून तो केव्हांही जवळ येऊ शकत नाही. म्हणजेच येथे द्वैत आहे. ज्या सेवेकऱ्याला ज्या ठिकाणी शरण आहे, तेच ठिकाण सर्व ठिकाणी दिसेल. तो मात्र हालचाल इकडे तिकडे केव्हाही करणार नाही. प्रत्येक सेवेकऱ्याने ह्याच्यावर विचार करावा.
ईश्वरी तत्त्व कोठे आहे? या सर्वांचा परिपूर्ण विचार करावा. या पलीकडे काहीं सांगण्याची आवश्यकता नाही.(समाप्त) ©️