विठ्ठल – भक्तीचे मुळ म्हणजे काय? व कसे?
प्रथम कोणतीतरी एक वस्तू आपण नजरेसमोर आणतो आणि ती वस्तू सत् कृतीने पुजतो. त्या वस्तूवर भावना असावी लागते. आता ह्या सत् कृतीची जाणीव कशापासून होईल? तर एकच ! प्रथम सद्गुरुना शरण जायला हवे. मग ती वस्तू सर्व जगात सर्व ठिकाणी वावरते याची परिपूर्ण जाणीव होईल.
आता ती जाणीव कोणत्या स्वरूपाची? कोणत्या तऱ्हेने होईल? ज्या ठिकाणी आपण शरण जाणार, त्या ठिकाणी पूर्णत्व लीन व्हावयास हवे. त्या माऊलीच्या चरणात लीन झाल्यावर ती माऊली आपोआप मार्गदर्शक होते. ती मार्गदर्शक झाल्यावर त्या मार्गाने जाणे प्रत्येकाचे कर्तव्य होय.
आता तो मार्ग कोणता?
माऊलीस शरण गेल्यावर स्वयंप्रकाशाची जाणीव मिळतें. त्या प्रकाशाच्या अनुसंधनाने प्रत्येक ठिकाणची जाणीव मिळते आणि त्या रस्त्याने जर सेवेकऱ्याने मार्गक्रमणा केली तर उत्तमच ! मनाच्या आधीन होऊन जर तो चालु लागला तर घसरलाच म्हणून समजा ! जर सेवेकरी माऊलीच्या चरणात लीन झाला, तादाम्य पावला तर त्या सेवेकऱ्याला सोडून माऊली दूर आहे का? तर नाही. मात्र अशा पात्रतेचा तो सेवेकरी व्हायला हवा. जो होईल, त्यालाच प्रत्यक्ष दिसेल. प्रत्यक्ष अनुभव येईल अन्यथा नाही. नुसते मी सेवा करतो म्हणून जमत नाही. जमणार नाही. अशाने ते साध्य होणे शक्य नाही.
भक्ती म्हणून म्हणाल, तर ती जेवढी सोपी व सरळ तेव्हढीच ती कठीण व अवघड आहे. करील त्याला सोपी आणि ज्याची इच्छा करण्याची नाही, त्याला अत्यंत दुर्लभ होय. जो कृतीला निघाला, कर्तव्य तत्पर झाला, त्याला कठीण नाही. ज्याला कृती करण्याची इच्छाच होत नाही, त्याला पर्वतापेक्षाही जड व कठीण दिसते. यापेक्षा आणखी वेगळे काय सांगू? ©️
(समाप्त)