मन स्थिर होण्यासाठी – मन स्थिर होण्यासाठी तू त्यागी रहा. जे काही भले बुरे केले असेल, ते मला अर्पण कर. मन हे संपूर्ण समर्थांना अर्पण झाले, तर ते कधीही अस्थिर राहणार नाही. मी कोणीही नाही, हे सर्वस्व समर्थ चरणांवर वाहिलेले आहे अशी निष्काम भावना पाहिजे.
जीवात्मा जेव्हा शिवात्मा होतो त्यावेळेला तो निष्काम होतो. जीवात्मा दृश्य आहे तोपर्यंत सकाम वृत्ती आहे. जीवदशा म्हणजे एक लहर आहे. म्हणजेच मनाची ठेवण आहे. सकाम आशा समर्थ चरणांवर वाहिली कि ती शुद्ध होते. मग मन:स्वास्थ मिळते.
दर्शनात जाणीव रहीत होणे तेच परमसुख आहे. बाकीचे ते दुःख आहे. शरीर जर तुमचे नाही, तर बाकीचे काय तुमचे असणार? सुख पाहिजे असेल तर परम गतीत स्थिर होणे. सुख हे क्षणैक आहे.
कायम टिकणारे सुख –
आपणाला कायम टिकणारे सुख पाहिजे आहे. मानव जन्म कशासाठी समर्थांनी बहाल केलेला आहे, तर आपण उत्तम तर्हेचा मार्ग आक्रमून आपणात असणारा अविनाशी कधी पाहता येईल, समर्थ दर्शन कधी घडेल यासाठी मानव जन्म आहे. जड म्हणजे दृश्य स्वरूपाच्या सार्थकासाठी प्रत्येकाने तळमळावयाचे आहे. आपण जडत्व व जडत्वाचा परिणाम मनावर धारण करीत असतो, पण जडत्वाच्या ठिकाणी आशक न राहता परम गतीत आपले मन स्थिर केले, तर मग आपली मनोभावना निष्काम होते. जडत्व असल्याशिवाय सताची जाण घेता येणार नाही, बैठक मारता येणार नाही, म्हणून जडत्वाची आवश्यकता आहे आणि ती राहणारच ! ©️