अद्वैत भक्ती म्हणजे काय? व ती कशी करावी?
भक्ती करतो म्हणून ती होत नसते. करावयाची आहे म्हणूनही ती होत नाही. भक्ती करुन घेणारा व करणारा हा एकच असतो. तो शुद्ध स्फटिकासारखा भावना रहित असतो, कल्पना रहित, संशय रहित असतो. म्हणजे काहीच कल्पना नसते. यालाच म्हणतात अद्वैत भक्ती !
मात्र मानवांना अद्याप याची जाणीव नाही. भक्ती करतो, परंतु ती कोणाची करावयाची?
काहीजण भक्ती करतात, ती स्व:हितासाठी. काहीतरी साधण्यासाठी भक्ती करतात. मात्र साधनारहित, हितरहित, आशारहित, भक्ती करणारा क्वचितच असतो.
सद्गुरु भक्ती वा सदगुरू भक्तीची तऱ्हाच वेगळी आहे. या भक्तीला सत् असत, लटपट, खोटे नाटे, रिद्धी सिद्धी, तंत्र मंत्र, वनस्पती काहीही लागत नाही. फक्त येथे एकच आहे, सद्गुरु चरणात लीन आणि त्यांच्याच ध्यानात तादाम्य होऊन स्वतःच्या स्वरूपाची जाणीव करून घेणे, समर्थांच्या चरणात लीन होणे यालाच भक्ती म्हणतात.
ईश्वरी तत्त्व कोठे आहे नाही असे म्हणताच येत नाही आणि कोठे ठावही रिकामा नाही आणि असा कोणीही बोट लावू शकणार नाही. मुळापासून निष्काम भक्ती करीत राहिल, त्याला मात्र दर्शनास वेळ लागणार नाही. आशेच्या अनुरोधाने सकाम भक्ती जो करील, तो मात्र दुरवल्या खेरीज केव्हांही रहात नाही. इतकेही करून उलट तो म्हणतोच कि एव्हढे करून देखील मला दर्शन कसे मिळत नाही? विचार करा, अशाना दर्शन कसे बरे मिळेल? भक्ती करणारा, नामस्मरण करणारा तू कोण? कोणाच्या आधाराने भक्ती व नामस्मरण चालू आहे. याचा विचार मुळात करीतच नाही. ©️