मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥ तुका म्हणे गेलें व्यर्थ वायां विण । जैसा मृगसीण मृगजळीं ॥३॥
एखाद्या महान भक्ताला किंवा सेवेकऱ्याला, अह:र्निश सद्गुरु ध्यानात, नामात तल्लीन असता, रात्रंदिवस कष्ट केलेले असता, थोडक्यात शेवट शेवट, मुक्ति मोक्ष मिळण्याचा संभव असतो. अशी वेळ जवळ आली असताना, त्याला कशाची आशा सुटते? तो कोणत्या रस्त्याने जातो? तर त्याला मायेची आशा लागते. थोडासा सताचा विसर पडल्यानंतर हे माझे, ही माझी जमीन, माझा पैसा, सर्व माझे माझे म्हणतो. मग मुक्ति आणि मोक्ष सानिध्यात येईल नाही का? असा सेवेकरी असल्यानंतर, त्याने माझे माझे म्हटल्यानंतर, त्याला सताच्या नामाचा विसर पडतो. मायेच्या आधीन झाल्यानंतर तो बद्ध होतो. म्हणजेच सतापासून दूर जातो. मायेच्या कक्षेत पूर्ण सापडल्यानंतर तो बद्ध झाला.
सत सानिध्यात असताना त्याचा आवाज खणखणीत असतो. मायेच्या कक्षेत गेल्यानंतर बद्ध होतो. म्हणजे प्रकाश बंद, श्रवणी बंद, सर्वस्व बंद ! मग त्याला काहीच करता येत नाही. त्याला, कोणाचे ध्यान करतो याचे भान राहत नाही. बद्ध झाला नसता तर सर्वस्व चालू राहिले असते. बद्ध झाल्यानंतर प्रकाश, श्रवणी कसली गती नाही. कारण माझे माझे म्हणणे !
सताने म्हटले आहे की ही दृष्टी सगूण रूपात निमग्न होऊ दे. त्यातच सर्व काही होईल. सगुणापासून दृष्टी लांब घालवू नको. म्हणून म्हटले आहे, सगुणाचा सार, येणे नाम संसार ! म्हणजे सगुण पाहता पाहता निर्गुणाप्रत आपोआप जातो. जो माझे माझे म्हणतो, हे मी केले, ते मी केले, पण काय करतो आहे? काय घेतो आहे? काय नेतो आहे? हे त्याला कळलेले नाही. मग माझे माझे का म्हणतो? हे कळत नाही. (पुढे सुरु…..२)©️