येथे सांगितले जाते, ते अनुभवातले सांगितले जाते. प्रत्यक्ष सहजासहजी विषयी निघाला की त्याच्यावर प्रवचन सुरू होते. सत् सानिध्यात फार नितांत श्रद्धा असावी लागते, नाही पेक्षा जसे सेवेकरी तसे मला वागावे लागते.
सेवेकरी नितांत, मी पण नितांत. सेवेकरी आत बाहेर, मग मलापण नाईलाजाने तसे वागावे लागते. अहर्निश प्रापंचिक बाबी करता, काबाड कष्ट करता, एरवी ज्योती साठी खटाटोप करता, पण जड भारी झाले, तर कोण उपयोगी येते? प्रसंगाला कोण? तर फक्त सद्गुरु ! म्हणून आसनावरून जे सांगितले जाते त्यावर अढळ श्रद्धा ठेवून आपण वाटचाल कराल तर पुष्कळ कमावले असे म्हणावे लागेल.
आपणाला प्रत्यक्ष अनुग्रहाचे दिवशी अनुभव दिला आहे. याप्रमाणे सेवेकऱ्याने पथ्य पाळली तर? सांगणे हे आद्य कर्तव्य ठरते नाही का? प्रत्येक गोष्ट जो जो सेवेकरी करतो, चांगली म्हणा अगर चौकटीच्या बाहेरची म्हणा, प्रत्येक बाबीकडे लक्ष असते. पण संशय युग असल्यामुळे काही बाबतीत डोळेझाक करावी लागते. कारण मानव आहे. चालायचेच ! पण काही बाबतीत डोईजड वागू लागला तर लक्ष घालावे लागते. मग जय कोणाचा होतो? जो कमविल त्याचा उपभोग घेईल. जो कमावणार नाही, त्याच्या सारखा दुर्भागी तोच !
फक्त आज इतकेच सांगावयाचे आहे की सेवेकऱ्याने वाटचाल करताना डोळ्यासमोर सतत सद्गुरु मूर्ती ठेवून जे काय अखंड नाम बहाल केले आहे, त्याचा मुखात उजाळा करून वाटचाल केली तर कशी प्रचिती येते त्याची खूणगाठ मनात बांधावी. (समाप्त) ©️