मी असतो सर्वांचे शरीरी ! तरी एक भक्त, एक का वैरी !! दीपकाचे अंगी नाही दूजा-भाव ! चोर आणि साव सारखेची !!
चोर असो अगर साव असो, प्रकाश सर्वांना सारखाच मिळतो. तद्वतच आपल्या दरबारच्या शिकवणीचा मार्ग आहे. हा राजमार्ग आहे. या मार्गाने गेल्यानंतर चोर असो वा साव असो, त्याच्याशी आपला संबंध नाही. या ठिकाणी सुद्धा सेवेकऱ्यांना विचार पडतो, मग एक भक्त आणि एक वैरी का? विचार पडतो कसा उलगडा करायचा? सगळ्यांच्या ठिकाणी ते आहेत.
चार अवस्था, चार खाणी – सर्व ठिकाणी ते आहेत. मग ही ओवी अशी कां?मी कोणाला देत नाही. जे दिले ते पूर्वीच दिलेले आहे. सत बुद्धि म्हणा, किंवा असत बुद्धी म्हणा ही ज्याच्या त्याच्या संगतीने लाभलेली असते. सेवेकऱ्यांचे कर्तव्य श्रेष्ठ असेल तर असत सुद्धा बाजूला सारले जाते. कोणत्याही ज्योतीला जशी संगत असेल त्याप्रमाणे वळण लावले जाते. असत संगत असेल तर अघोर मार्गाने जाईल. माझा काही संबंध नाही. संचिताप्रमाणे ती ज्योत वाटचाल करते. जसजसे ज्याने कमावले त्याप्रमाणे तो उपभोग घेत असतो.
काही ठिकाणी सांगितले जाते की संसारी असावे, असोनी नसावे. संशयी जगात जरी वावरत असलात तरी त्यात सामील व्हा, पण सामील होऊन अलिप्त राहा. याप्रमाणे वाटचाल केलीत तर काळे डाग लागतील का? ज्याचे त्याने अनहित केले, कोणाचे काय बा गेले?
सेवेकऱ्यांची केवढी कुवत आहे, पण सेवेकर्यांनी जाणले नाही. या ठिकाणचा सेवेकरी, पण बाहेर गेल्यानंतर तो सद्गुरु आहे. मग त्याला काळे लागेल का? म्हणून सद्गुरुनी जे बहाल केले, त्याचा अहोरात्र उजाळा केला, स्मरण केले, सद्गुरु मूर्ती सतत डोळ्यासमोर तेवत ठेवली तर काळे डाग लागणार नाहीत, त्याला ते लागू देणार नाहीत.
इतकेच सांगावेसे वाटते की, थोडे मैले कपडे असले तर डाग उठून दिसणार नाहीत, पण स्वच्छ कपड्याला काळे डाग लागले तर उठून दिसणार, म्हणून सद्गुरु मार्गातील ज्योतीचे पाऊल वाकडे पडले तर उठून नाही का दिसणार? म्हणून आपल्या चार तत्त्वांना बाधा न येईल असे वर्तन ठेवा. येथे जे बोधामृत पाजले जाते, चार तत्वे सांगितली जातात, त्याप्रमाणे जर ज्योत वाटचाल करील, तर त्याला काळे कोण लावील कां? पण ज्योत ठाम, अढळ श्रद्धावान पाहिजे. आपणास जे अखंड नाम बहाल केले त्याची आठवण ठेवून, सद्गुरु मूर्ती डोळ्यासमोर ठेवून, वाटचाल केलीत, तर कोणत्याही अडचणी भासणार नाहीत, भासू देणार नाहीत. अशा तऱ्हेने सेवेकऱ्याने वाटचाल करणे हे आवश्यक आहे. (समाप्त) ©️