हे सर्वस्व तुमच्या कृतीच्या आधीन आहे. पण याच्या उलट, दृश्य धन लाभल्यावर त्याला इतरांची किंमत वाटत नाही. ओळख रहात नाही. त्यात तो एवढा गुरफटतो कि, त्याला वाटते हेच सर्वस्व परब्रम्ह आहे. यातच सर्वस्व स्थावर जंगम संपत्ती आली. या व्यक्त धनासाठी कोर्ट कचेऱ्या, भानगडी वाढतात. भांडणे होतात. एवढे जरी झाले, तरी व्यक्त धन त्याच्याबरोबर जाते कां?
आपल्या या भूमीत आपले पूर्वज होऊन गेलेत. त्यांनी कितीसे धन आपल्याबरोबर नेले? धन तरी त्यांच्याबरोबर गेले कां? नाही. जाताना जे दृश्य धन आहे, संपत्ती आहे, ती सुद्धा बरोबर येत नाही. म्हणून हे सर्वस्व झूट आहे. झूठा पसारा आहे. कोणीही कोणाचे नाही. म्हणून निष्काम व्हा ! संपत्ती मिळाली म्हणून वाटेल तशी उधळू नका. ज्याचे प्रथम घर समाधानी, तोच समाधानी असतो. म्हणून संचिताप्रमाणे कितीही संपत्ती मिळाली तरी तिचा योग्य तर्हेनेच उपयोग करा. याचा अर्थ असा नव्हे कि, व्यक्त संपत्तीला लाथाडणे.
स्थुलाला व्यक्त संपत्तीची जरूर आहे. हे जरी आहे, तरी आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्यावर अवलंबून असणाऱ्या ज्योतीचा सुद्धा त्यात हिस्सा आहे. त्यांना सांभाळूनच स्थिर ठेवावे लागते.
मन स्थिर राहण्यासाठी धनाची आवश्यकता लागते. म्हणून धन पाहिजे. संचिताप्रमाणे ते मिळेल. देणारच ! पण धनाचा लोभ असता उपयोगी नाही. साठवा, बँकेत ठेवा, पण सत् कार्यी लावा. हाव धरू नका. धन मिळते ते एकाचेच नाही, तर तुमच्या सानिध्यात ज्या ज्योती असतात त्यांचा पण हिस्सा असतो. पशुपक्षी बघा ! त्यांना जे मिळेल ते आपल्यावर अवलंबून असणाऱ्या ज्योतीना भरवतात. त्यांचे उदाहरण नजरेसमोर ठेवण्यासारखी नाही कां? म्हणून दृश्य संपत्तीमुळे किती घरांचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे भांडणे होतात. वाद वाढतात. कितीही परममित्र असला तरी धनामुळे तो शत्रू बनतो. एवढे खरे की, दृश्याला दृश्याची जरुरी आहे. ©️
(समाप्त)