आपण सर्वस्व दृश्य आहोत. जडत्व आहोत. दृश्य हे सर्व जग आहे. चर अचर सुद्धा दृश्य आहे. ज्याला हालचाल नाही ते निर्जीव आणि ज्याला हालचाल आहे, ते सजीव. हे सुद्धा दृश्य आहे. आपल्या गेल्या जन्मीचे जे प्रारब्ध त्याप्रमाणे या योनीत सत फळ मिळत असते आणि ते समर्थ देतात. समर्थ म्हणतात, “मी कोणाचाही ऋणी नाही. ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे मी फळ देत असतो.” दृश्याला दृश्य फळाची आवश्यकता आहे.
वयाच्या १८ व्या वर्षी लग्न होते. मग हालचालीला सुरुवात होते. मग खोलीची जरूर भासते आणि त्याप्रमाणे धन मिळाले की, हालचालीला सुरुवात होते. याप्रमाणे दृश्याला दृश्याची आवश्यकता आहे. पण, प्रथम नि:ष्काम गती पाहिजे.
मी जरी काम करतो, काम करण्यासाठी मजूर लावतो, घरे बांधतो, दगड लावतो तरी हे माझे काही नाही. सर्वस्व भगवंताचे आहे. मी निमित्त मात्र आहे. इतकी जरी धारणा झाली, तरी गती नि:ष्काम होते. मग सर्वस्व आपोआप जाग्यावर येते. पण नि:ष्काम धारणा ठेवली पाहिजे. पण, याच्या उलट स्थिती झाली तर मन बेचैन होते. पण दृश्यातच राहून, दृश्याशी खेळ खेळत स्थिर व्हावयाचे आहे. सर्व ऋषीमुनी होऊन गेले. त्यांची धारणा नि:ष्काम होती. ते म्हणत, “कर्ते, करविते निराळे आहेत. आम्ही निमित्त मात्र आहोत. सर्वस्व त्यांच्याच कृपेने होते.”©️