श्री समर्थ मालिक – “समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे ||जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||”
समर्थांचा जो सेवेकरी आहे, जो सत आहे, तो सत् मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला समर्थांशिवाय, एकाच तत्त्वाशिवाय काही दिसत नाही, असा सेवेकरी अह:र्निश चरणात लिन झालेला असतो. त्याच्यावर शत्रु, चोर, सावज कोणी जरी असले, तरी अशा सेवेकऱ्यावर चाल करतात नाही का? तर नाही. समर्थांच्या सेवेकऱ्यावर कोणाचेही काही चालत नाही. चालू शकत नाही. चत्वार खाणीतील प्राणी, सर्प, पिशाच्च कोणाचेही काही चालत नाही.
दुश्मन वाईट कृती करू लागला तर त्याचीच कृती त्याच्या अंगावर येते, जो समर्थ सेवेकरी आहे. पण सताच्या जोडीला असत हे असतेच. याचे आदीअंता पासून लिखाण आहे. सताच्या ठिकाणी असत हे आहेच, पण सताचा कोणी केस तरी वाकडा केला आहे का? त्याचे कारण काय? येथील सेवेकर्यांना अनुभव आला आहे की नाही? याचे कारण काय? ज्याच्या मनाची भावना शुध्दत्वाने सताच्या ठिकाणी रममाण झालेली आहे, त्याला चोर, सर्प, वाघ सर्व समान दिसते. समर्थमय झालेल्या ज्योतीला समर्थ तत्त्व सर्व ठिकाणी दिसते. त्याने समर्थांची ओळख केलेली असते. त्याच्या ठिकाणी क्रोध, अहंकार, मी, तू हे नसते. त्याच्या जवळ काही शिल्लक नसते. त्याने अहंकार सर्वस्व मारला, सर्वांचा त्याग केला, तर अशा सेवेकऱ्याला कोण काय करणार? समर्थांचे लक्ष जर त्याच्यावर आहे, तर त्याला कोण काय करणार? याचा अनुभव रामदासांनी घेतला, म्हणून हे लिखाण केले.
मग त्यांच्याप्रमाणे सेवेकरी समर्थमय होतील का? मग अशा सेवेकर्याचा केसही कोणी वाकडा करू शकणार नाही. त्याला कसलीही न्यूनता भासणार नाही. तो भीक मागण्या जाणार नाही. समर्थ त्याला भीक मागू देणार नाहीत. पण कर्तव्य कोणते हे माहीत असून सुद्धा दुसरीकडे भटकत राहिला, चेष्टा मस्करी करीत राहिला, आणखी व्याप करीत राहिला तर समर्थांचे अह:र्निश त्याच्यावर लक्ष असते नाही का? अशा सेवेकर्याला थोडीशी बाजू देतात. एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे ही गती मिळाली असताना, अखंड तत्व बहाल केलेले असताना, त्याचाच सेवेकऱ्यांनी उजाळा करणे. सद्गुरू शिवाय आणखी दुसरे तत्त्व कोणी आहे का? म्हणून याच तऱ्हेने सेवेकऱ्यांनी समर्थमय होण्याचा प्रयत्न करणे हे संदेश आहे. (समाप्त) ©️