मनुष्य हा प्राणी श्रेष्ठ मानला जातो. त्याने श्रुति, स्मृती, अनुभव ह्या तिन्हीचा त्रिवेणी संगम आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने करणे आवश्यक आहे. या ठिकाणी सत् चित् आनंद एक क्षण का होईना, प्रकृतीच्या दृष्टीने का होईना, लुटण्यास मिळतो.
आपले कर्तव्य कोणते? कोठे गेल्याने परम निधान तत्व प्राप्त होईल? सत् स्वरूप, सत्चिदानंद या दोन्ही स्वरूपाची ओळख कोणत्या ठिकाणीं होईल? हे अजमाविण्यासाठी, याचा अनुभव घेण्यासाठी आणि याच्या प्राप्तीसाठी मायावी पसाऱ्यातून मन काढून घेतले पाहिजे. मायावी बंधने, षड्रिपूंची जाळी तोडली पाहिजेत आणि ती तोडण्यासाठी अविश्रांत धडपड करणे, सद्गुरूंना तन, मन, धनाने शरण जाणे व त्यांच्याच कृपा प्रसादाने आपल्या परम निधान तत्वाचा शोध घेणे, त्यांची जाण घेणे हेच प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे आणि याप्रमाणे प्रयत्न केला नाही तर आपल्या स्वरूपाची ओळख होणे कदापीही शक्य नाही.
सद्गुरु चरणात विलीन झाल्याशिवाय, तेथे लय पावल्या शिवाय सद्गुरूंची ओळख होणे शक्य नाही आणि ज्यावेळी प्राप्त कर्तव्ये निष्कामतेणे करीत करीत सद्गुरु चरणांत लय पावाल, सर्वस्व विसरुन जाल, त्यावेळी सताची ओळख पटेल. परंतु ते सांगता येणार नाही. सर्व त्याठिकाणी लय पावते. असे ते परम निधान तत्व आहे.
या अवतार कार्याप्रमाने मानवांचा उद्धार करण्यासाठी अनेक तत्वे निर्माण केली आहेत व ती आपआपली कर्तव्ये करीत आहेत. (२/५८) ©️