श्री गुरु पौर्णिमा –गुरुपौर्णिमा महत्व – हा स्वयम् सिध्द दिवस आहे. तो दिवस निर्माण केलेला नाही. त्या दिवशी अखंड तत्व खडे असते. त्याची महती फार श्रेष्ठ आहे. त्याचे तत्व फार श्रेष्ठ आहे. त्याचे वर्णन कोणालाही करता येणार नाही. असे हे अखंड तत्व आहे. ज्या दिवशी निर्माण त्या दिवशी तत्व प्रगट आहे. गुरुपौर्णिमा प्रगट नाही, तर स्वयम् सिद्ध दिवस आहे.
आज शुभ दिनी केलेली सर्वस्व पूजा चरणावर रुजू आहे. त्यात कोणत्याही तऱ्हेची उणीव नाही. आजचा दिन महान शुभदिन गणला जातो. याचा अर्थ एवढाच की, सेवेकर्यांना सद्गुरूंनी जो अखंडपदाचा ठेवा दिला त्याचा उजाळा करणे.
गुरु म्हणजे काय? अखंड ठेवा म्हणजे काय? याचा उहापोह करून सेवेकरी सद्गुरूं पासून दूर झाला असेल तर त्याला जवळ घेणे. सद्गुरु आणि सेवेकरी हे अखंड नाते आहे. हे अखंड नाते अखंडत्वाने राहण्यासाठी या शुभदिनाचे महत्त्व आहे. कोणतीही महान शक्ती असो, ती या शुभदिनी दर्शन मिळविण्यासाठी हपापलेली असते. सद्गुरु मुखातून या शुभदिनी बाहेर पडलेले बोल झेलण्यासाठी सर्वस्व आतूर झालेले असतात.
सद्गुरु साधी चीज नाही. ज्याने ओळखले, महत्व जाणले, घेतले ते महाभाग होते. सेवेकऱ्यांना सांगणे आहे – आपल्या सद्गुरूंची मनोभावे, आनंदी अंत:करणाने पूजा करावयाची असते. मनात कोणत्याही तऱ्हेचे किल्मिष ठेवावयाचे नाही. सेवेकरी मनात विकल्प आणतात ते बरे नाही. सेवेकऱ्यांची पूजा घेतल्याशिवाय सद्गुरु राहत नाही. आपली पूजा यथासांग झाली किंवा नाही अशा द्विधा भावनेने काही सेवेकरी पूजा करतात. पण आपल्या सेवेकऱ्यांची पूजा, जी त्याने केली ती सद्गुरू चरणांवर रुजू करून घेतात. पण सेवेकऱ्यांना अशी द्विधा भावना कां निर्माण होते?
सेवेकरी देऊन देऊन काय देणार आहे? पण सतशुध्द अंत:करणाने, मनोभावनेने, अंत:करण सर्वांगीण शुद्ध ठेवून तुळशी पत्र जरी दिले तरी सद्गुरु आनंदी असतात. पण सेवेकर्यांनी आत बाहेर न होता, आजच्या शुभदिनी केलेली सर्वस्व पूजा चरणांवर रुजू झाल्याशिवाय कधीही राहणार नाही असे ठाम का बनू नये? सेवेकरी आंतबाहेर का होतात? याचे विवरण केले आहे. जे प्रथम दर्शन झाले, ते सत भावनेने झाले. तेच चरणांवर रुजू होत असते. शंका ही सेवेकऱ्याने आपल्या मनात कधीही धरावयाची नाही. आपण सद्गुरूंना अर्पण केले आहे.©️