वालावल आश्रम – एक पूजनीय स्थान, एक वंदनीय स्थान ! पूजनीय या अर्थाने की येथे आपल्या श्री सद्गुरु माऊलींच्या कलियुगातील या २६ व्या अवतार कार्याचा प्रारंभ झाला. वंदनीय यासाठी की येथे श्री गुरुदेव पितामह यांचा रामावतारातील आश्रम होता.
आपणास कल्पना आहेच की श्री गुरुदेव पितामह म्हणजे, आपले श्री गुरुदेव वसिष्ठ ! रामावतारात श्रीरामांचे सद्गुरूपद यांनी नटविले होते. याचाच अर्थ असा की श्रीराम हे उत्तरेतील अयोध्ये मधून थेट या वालावल आश्रमात त्यावेळी आले होते.
श्री राम अवतार हा पुरणातील दहा अवतारांपैकी सातवा अवतार होय, जो त्रेता युगामध्ये संपन्न झाला असे म्हटले जाते.
श्री समर्थ मालिक आपल्या दिनांक: २३ मार्च १९७२ च्या संदेशात बऱ्याच गोष्टी उघड करताना म्हणतात, “माझ्या अवतार कार्याच्या वेळेस अघोरांचा स्थूलांगी नि:पात केला, त्याचेच शेष राहिलेले हे कार्य सत्पदाचे आसन करीत आहे.” पुढे ते म्हणतात,”मी जरी राम असलो, तरी माझ्याकडून कर्तव्य करून घेणारे ते परम तत्व आहे.”
पुढे आठवण करून देताना ते म्हणतात,”परत अयोध्येला येताना कोकणात ज्या ठिकाणी समर्थ आसन आहे, त्या ठिकाणी सीतेसह उतरलो.”
“माझा पूर्णपणे त्या भूमीत वास आहे. नंतर तेथून मी अयोध्येला गेलो. ज्या ठिकाणी उतरलो, ती भूमी फारच शुद्ध आहे. त्याच भूमीच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष समर्थ आसन पडले आहे.”
पुराणात फक्त दहा अवतार कार्यांचा उल्लेख आढळतो, तर आपल्या श्री सद्गुरू माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे एकूण २५ अवतार कार्ये झालीत आणि आत्ताच कलियुगामध्ये श्री सद्गुरु माऊलींच्या रूपाने सव्वीसावे अवतार कार्यही अवधीतच संपन्न झाले, तर अशा या परमपवित्र स्थानाची कथा आपणा सर्वास विदीत आहेच.
विशेष म्हणजे या अवतार कार्यात श्री सद्गुरु माऊलींचे नामाभिधान साक्षात भगवान हे होते, तर त्यांच्या तातांचे नामाभिधान नारायण हे होते, म्हणजे साक्षात भगवंतांनीच हे अवतार कार्य संपन्न केलेले आहे असे म्हणावयास कोणतीही अडचण नसावी.
अशा ह्या ऐतिहासिक, वंदनीय, पूजनीय आश्रमाच्या नूतनीकरणाचे कार्य श्री सद्गुरू माऊली कृपेकरून प्रारंभ करून काही अवधीतच पूर्ण करण्यात आले होते. त्या वेळची क्षणचित्रे येथे प्रस्तुत करण्यात आलेली आहेत.