सत चरणांचा अंत घ्या. चरण सापडले की पुढे वाटचाल आपोआप सुकर होईल. काही सेवेकऱ्यांना चरण सापडलेले नाहीत. चरण सापडले तर इतर कर्तव्यांची आवश्यकता काय? मग त्यांच्या लिलेचा अंत घेण्याची गरज काय? घेऊ म्हटले तर घेऊ देत. म्हणून पूर्वजन्मीच्या अनुसंधनाने कर्मसंचिताप्रमाणे कर्तव्याची घडण सत् तर आता ही सत् ! म्हणून पूर्व कर्माप्रमाणे घडण म्हणून या सानिध्यात आले त्यांना सुख आणि दुःख आहे, पण पूर्वी काय केले याची कल्पना नाही. तीच भोगत्वाची पूर्णता आत्ताच केली, मग पुढे मोकळा खडखडीत होशील. पण आता जर का लांड्या लबाड्या केल्या, तर मग मात्र तुला कुठे फेकावे आणि कोठे नाही याचा विचार करावा लागेल.
जे घडत आहे, घडवित आहे ते चांगल्या साठीच घडत आहे, घडवीत आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्यांनी सत् मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा.
सेवेकरी सद्गुरुना शरण आहे, मग त्याचे मन कुठे पळते? काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी त्याचे मन धावत असते, तर कोणाचे मल्हारीच्या दर्शनासाठी धावते, तर कोणाचे अंबेच्या दर्शनासाठी धावते आणि बर्याच ठिकाणी मन धावत असते.
मी सद्गुरूंचा सेवेकरी आहे. मग सद्गुरु तत्व ओळखले का मी? ज्याने ओळखले तो दिवटी घेऊन जगभर नाचणार नाही. जातो सताच्या मेळ्यात आणि घरी येऊन हातात दिवटी घेऊन गोंधळ घालावयाचा. असे मानव शेवटी सत भक्तीला टाकून भगतगिरीच्या पाठीमागे लागतात. अशा ज्योतीला सूक्ष्म योनीत ठेवले तर काय बिघडले? जो भुताच्या आधीन झाला, त्याला मी भूतच बनवतो. तो भगतगिरीच्या आधीन बनून दैवतांची उपासना करतो. त्यांच्या मनाचे कोडकौतुक त्यांच्याच मनाने पुरे करावे लागते, म्हणून हे सर्वस्व मी घडवून घेतो.
महान स्वयंभू, कैलासी धानस्थ असताना, पार्वतीने नाच मांडीला. त्या नाचाला तो भाळलाच की नाही? अंबा साधीसुधी ज्योत नाही. तिने पण भक्ती केली आहे. स्वयंभू ने सुद्धा भक्ती केली आहे. अंबेच्या अंत:र्यामी सुद्धा मीच आहे. स्वयंभूच्या अंत:र्यामी सुद्धा मीच आहे. मग तो फसला कसा? यात काहीतरी गुढ आहे. (समाप्त)