मानवाची मानवता – सूक्ष्म म्हणजे प्रणवातीत स्थिती. सूक्ष्मातून स्थुलात येणे होते. स्थुल श्रेष्ठ आहे. कारण सद्गुरु सानिध्यात स्थुलानेच वाटचाल करता येते आणि सताला डोळे भरून पाहता येते. हे फक्त स्थुलातच होऊ शकते. मानवाचे कर्तव्य उज्वल असेल तरच तो ईश आहे, पण त्याचे कर्तव्य हीन दर्जाचे असेल तर त्याला सानिध्य मिळण्यासाठी काही जन्म घ्यावे लागतात.
मानवाला मानवता समजली नाही तर तो मानव कसला? मानवता म्हणजे एकमेकाबद्दल आदर ! म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवणे, मी यातून निराळा आहे, म्हणजे मानवता घसरली जाणार नाही.
मानव श्रेष्ठ योनी आहे. संपत्तीवान असो, धनवान असो, पण मानवता पाहिजे. ती एकदम येणार नाही. हळूहळू अभ्यासाने साध्य केली पाहिजे. म्हणून मानवता सिद्धता झालीच पाहिजे. मानवते शिवाय मन स्थीर होणार नाही. प्रकाशित होणार नाही. आपणाला जे मिळवायचे ते मानवते शिवाय मिळणार नाही. मानवतेच्या गतीने प्रत्येकाने गेले पाहिजे. अशा तऱ्हेने सेवेकरी गेला तर माझी खात्री आहे की, तो समर्थांना डोळे भरून पाहिल. म्हणून मानवता श्रेष्ठ आहे. त्या तऱ्हेने स्थूल जाईल तरच ते पवित्र आहे. पण मानवता साधता आली पाहिजे. मानवता सर्वांगीण नटलेली आहे. जी ज्योत मानवतेने नटलेली आहे, त्याच्या तोंडावर तेज दिसते. ती कोणाचा हेवा दावा करणार नाही. त्याची भावना समान असते. आदरयुक्त असते. त्याच्या ठिकाणी दया असते. ©️