भक्ती किती साधीसुधी गोष्ट आहे. भक्तिमार्ग हा राजमार्ग आहे. हा राजमार्ग कोणाप्रत जावयाचा आहे, याचा शोध प्रत्येक भक्ताने करावयाचा आहे. या राजमार्गाच्या योगानें मनाची भूमी शुद्ध व सात्विक होते आणि संतांचे, सत्याचे व सात्विकतेचे वळण मनाच्या ठिकाणीं निर्माण होते. ज्यावेळी शुद्घ सात्विकता निर्माण होते, त्यावेळी आपले परमेश्वर आपल्या प्रबळ इच्छा व भावना तृप्त करतात.
कोणता परमेश्वर, कोणता पांडुरंग पहावयाचा?
विटेवरी उभा, कटेवरी हाथ ! हा पांडुरंग पहावयाचा की याच्याही निराळा पांडूरंग पहावयाचा? त्याच्याच दर्शनासाठी भक्ती मार्गाने जावयाचे. भक्ती शुद्ध मनाने, प्रत्यक्ष कृतीने करावयाची याचा मेळ ज्याच्याजवळ आहे, त्याला सन्मार्ग सापडला आहे असे समजावे. भक्ती शुद्ध अंत:करणाने, तन, मन, धनाने (अशा तऱ्हेने) सेवा केल्यास पांडुरंग दूर नाही. पांडुरंग बडबडण्याने, टाहो फोडण्याने मिळत नाही.
पांडुरंग याचा अर्थ शुध्दता, सात्विकता, सत् आणि सत्य हाच होय. पांडुरंग शोधण्यासाठी अंत:करणाचा ठाव घ्यावा लागतो. फक्त टाहो फोडण्याने दर्शन कदापिही मिळणार नाही. त्या पांडुरंगास पाहण्यासाठी राजमार्गाने जावयास पाहिजे. म्हणजेच भक्ती मार्गाने जावयास पाहिजे, त्याच वेळेला आपल्याला भगवंताचे दर्शन होईल !
पांडुरंग म्हणजे शुध्द पांढरा रंग ! तो दूर नाही. प्रत्येकाच्या अंत:र्यामी तो आहे. त्याला उपास – तापास, तीर्थक्षेत्र वगैरेची काहीच जरूरी नाही. त्याला डोळे भरून पाहण्यासाठी, त्याच्या सेवेत निमग्न होण्यासाठी भक्ती आहे. जो त्याच्यापर्यंत पोहचण्याचा राजमार्ग आहे.
भक्ती ही अनेक प्रकारची, अनेक मार्गाची आहे. ती भक्ती ही नव्हे. भक्तीचा अर्थ फारच निराळा आहे. तो सन्मार्ग आहे. राजमार्ग आहे. देव दूर नाही. पाहायला गेल्यास जवळ आहे, नाहीतर फार फार दूर आहे. त्याच्या दर्शनासाठी, त्याला पाहण्यासाठी सर्वस्व त्यांच्या चरणी ठेवायला हवे. त्याच्या शिवाय पांडुरंग मिळणार नाही. (1) ©️