सत भक्तीसाठी प्रकृतीमध्ये एवढे स्नेह आहेत, ते सत चरणात निमग्न होऊन ओलावले असतील, तर एकाच ठिकाणी स्थीर राहतात. मन अमृतमय झालेले असते. रसना, प्रेम जर अमृतमय झाले, मग मन कोठे जाईल? जी इंद्रिये आहेत, ती सद्गुरुमय झाल्यानंतर इकडे तिकडे होतील का? भक्तीला प्रथम प्रेम पाहिजे. ते प्रेम शुद्ध असेल तर मन आकळता येते.
स्नेह अमृत झाल्यानंतर, मग जो पाझर फुटतो तो कोठे जातो? १७ वी जीवनकळा कोठून सुटते? सर्वस्व स्नेह ओलावले, तन्मयता साधली, पूर्ण निमग्न झाला कि नंतरच १७ वी जीवनकळा सुटल्यानंतर तो सताला पाहू शकतो. त्या सुखासाठी रसना ओलावली पाहिजे. मन शुद्ध झाले पाहिजे. भक्तीला प्रथम प्रेम पाहिजे. भाव पाहिजे. पण तो कसा पाहिजे? तर शुद्ध स्फटिकासारखा पाहिजे. प्रेम पाहिजे. रसना ओलावल्या मग त्याच अमृतमय होतात. पण त्याला प्रकृती कशी हवी? हे कशाने होईल? कसे होऊ शकते? रसना ओलावण्याकरिता काय पाहिजे? याला स्वतःचा पाया, घर मजबूत पाहिजे. प्रकृती शुद्ध पाहिजे. प्रकृती शुद्ध झाल्यानंतर मग वेळ आहे का? भूमी शुद्ध नसेल तर रसना ओलावणार नाहीत, म्हणून प्रथम प्रकृती शुद्ध पाहिजे. तेव्हा समर्थ प्रकृती पाहूनच आपल्याला आपल्या सानिध्यात घेतात. नाहीतर सानिध्य मिळणे दुरापास्त आहे.
सकळ मंगळे त्या ठिकाणी वळल्यानंतर बाकी काय राहते? शुद्धात शुद्ध मिसळल्यानंतर अशुद्ध राहील का? अशी दृष्टी मंगलमय झाल्यानंतर सर्वत्र समर्थांना पाहू शकतात. असे दिसत असताना सेवेकऱ्यांना थोडी हुक्की येते. मग हा सेवेकरी असा कधी होईल बरे?
आर्यवर्ता पासून जे महान सतपुरुष होऊन गेले ते एकमेकांची टिंगल करीत नव्हते. सर्वस्व मंगले या ठिकाणी रममाण करण्याचा प्रयत्न करा. सकळ इंद्रिये ब्रह्मरूप झाली तर बाकीचे काय उरले? मग सत् आणखी वेगळे आहे का? म्हणून तुम्ही विचार करा. सेवेकरी कसा पाहिजे? त्याची पात्रता कोणती पाहिजे? अजून सेवेकरी पूर्ण झालेले नाहीत. म्हणून सेवेकर्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (समाप्त) ©️