श्री समर्थ मालिक म्हणताहेत, त्या अखंड सत् तत्वाची गती मिळवून दिली, त्या अखंड तत्त्वापासून कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर काय होते, काय नाही, खरे किती, खोटे किती याचा सेवेकऱ्यांनी बोध घ्यावा. पण हे करताना त्या सेवेकऱ्याची कृती मात्र सत् पाहिजे. मी सत् किती करतो, असत किती करतो, याचे मायेत राहून सताचे घर्षण करणे, सानिध्य मिळविणे, त्याचा पूर्ण अंत:करणापासून उजाळा करणे, म्हणजे बुद्धीला सत चेतना मिळते, याला म्हणतात बोध !
ज्याने आपणाला अखंड पदाची माहिती दिली, ते तत्व कोणते आहे, हे सेवेकऱ्यानी अद्याप पर्यंत आपल्या ध्यानात घेतले नाही. मनाला जी कलाटणी मिळते, त्या कलाटणीला बाजू देऊन वाटचाल करणे. मला रंग ना रुप, वास ना गंध, मग आकार कोणता द्यावयाचा? ज्यांनी खूण दाखविली, त्याचाच आकार द्यावयाचा असतो. करतो कोण? करविता कोण? करून घेणारा कोण? व्यवहार चालतो कशापासून?
इतकेच की, मी माझे अंग दाखवत नाही. मायेकडून कार्य करून घेतो. जो सेवेकरी सत् मार्गाने चालला आहे, तो मात्र शुद्ध अंतःकरणाने लिन होऊन सत् गतीने वाटचाल करतो, तोच ओळखू शकतो. करतात ते मालिक करतात, मी निमित्त आहे असे सेवेकरी म्हणेल, मग मात्र बोधामृत चाखावयास मिळेल. सेवेकऱ्यांनी कर्तव्यात जागृत राहणे, उजाळा करणे. त्याचा उजाळा झाला की, प्रकृतीचा उजाळा होतो. प्रकृती जोपर्यंत अभिन्न होत नाही, तोपर्यंत मन अभिन्न होत नाही. मन जर भिन्न ठेवले, तर सर्वच भिन्न दिसेल. मनाला अभिन्न बनवा हेच संदेश आहेत.(पुढे सुरु…२)©️