स्वाभिमान आणि अभिमान –
स्वाभिमान आणि अभिमान याचा अर्थ एकच आहे. भक्ती करताना स्वाभिमान आणि अभिमान याने पूर्णपणे रहित होऊन भक्ती मार्गास लागणे. त्यानंतरच पुढच्या पायरीची जाणीव होईल.
स्वाभिमान आणि अभिमान या जाळ्यात गुरफटल्या नंतर भक्ती ही काय चीज आहे, याची जाणीव होणे अशक्य आहे. भक्ती करताना या दोन्हीं स्थिती स्वाभिमान आणि अभिमान यांनी पूर्णपणे रहित होऊन नंतरच तिथपर्यंत पोहचू शकाल. या जाळ्यात गुरफटल्या नंतर ती ज्योत केव्हाही पुढें जाऊ शकत नाही. कितीही धडपड केली तरी पुढें जाळे येणारच ! भक्ती मार्गात जाताना, प्रथमच जाळे तोडून भक्ती मार्गस्थ होणे.
प्रत्येक संत जर स्वाभिमान आणि अभिमान धरून चालले असते तर तेथपर्यंत त्या पायरीला पोहचले नसते. जर आपल्या आयुष्याचे कोटकल्याण करुन घ्यायचे असेल तर त्याला प्रथमच या जाळ्यातून मुक्तता करून घ्यावी लागते. तोच तिथपर्यंत जाऊ शकतो.
भक्ती ही चीज सोपी, तितकीच कठीण आहे. जो शुद्ध भावना व शुद्ध आचरण याने जातो त्याला केव्हाही अडथळे येणार नाहीत. ज्या ज्योतीच्या मनामध्ये स्वाभिमान आणि अभिमान जागृत आहे, अशा ज्योतीना प्रत्येक ठिकाणी अडथळे येतात. अडथळयात गुंतल्यानंतर पुढच्या मार्गाला चुकतात. तेथून खालच्या पायरीला येऊन पोहचतात.
बाबा – आम्हा सेवेकऱ्याना दर्शन कसे लाभेल? कोणत्या मार्गाने जावे?
ज्ञानेश्वर – अभिमान स्वाभिमान, अहंकार याने रहित होऊन जो जाईल, तोच त्या पायरी पर्यंत पोहचू शकेल.
बाबा – अहंकार रहित कसे व्हावे?
ज्ञानेश्वर – त्याचा नाश करण्यासाठीं प्रथम गुरु केला पाहिजे. गुरु सुद्धा सत् आचरण, सत् मार्ग याने चालणारा पाहिजे. तरच तो मार्ग दाखवू शकेल. जो सत आहे तो आपल्या शिष्यांना सत् मार्ग दाखविल. जो असत आहे, तो असत मार्ग दाखविला. याचा नाश करण्यासाठी गुरू ही चीज काय आहे, याची ओळख घेतली पाहिजे. नंतर आपल्या स्वरूपासी लीन होऊन याची जाणीव घेतली पाहिजे. तोच तिथपर्यंत त्या पदाला पोहचू शकेल. तोच खरा धन्य होय ! ©️
(समाप्त)