हा दरबार आदिअंतापासूनचा असा स्वयम् दरबार आहे. हा दरबार, हे ठिकाण सत् आहे. कोणालाही ते असत ठरविता येणार नाही आणि कोणी ठरविलेले देखील नाही, ठरवू शकणार नाही. हा कोणी मानवाने किंवा तत्वाने निर्माण केलेला दरबार नाही.
श्री प्रभू रामचंद्र चौकट मुनींना म्हणतात, “महामुनीश्र्वरा – आसनाधिस्त व आसन काय आहे, याची आपण पूर्ण जाणीव घेतली आहे. आपली इच्छा आहे काय? गजेंद्राला मुक्त करावयाचे आहे. महान कार्य गजेंद्राच्या हातून झालेले आहे.”
(एकंदरीत पाहता मागील आख्यायिका व आत्ताचे श्री प्रभू रामचंद्रांचे निवेदन यांचा साकल्याने विचार केला असता असे दिसून येते की, पौराणिक कथेत व आत्ताच्या निवेदनात महान मुनीवर अगस्ती मुनी यांचा उल्लेख आढळून येतो. इतकेच नव्हे तर श्री प्रभू रामचंद्र अगस्त्य मुनींना विचारतात, आपली काय इच्छा आहे? गजेंद्राला मुक्त करावयाचे आहे.)
तसेच आपल्या बाबांबरोबर बोलताना श्री प्रभू रामचंद्र म्हणतात, “संकटाचे वेळीं गुप्त मार्गाने गजेंद्र कोणत्या ठिकाणी गेले याची आपणाला पूर्ण जाणीव आहे. आपल्या इच्छेप्रमाणे नारायण व लक्ष्मी यांची स्थापना याच ठिकाणी करणे व गजेंद्रची मुक्तता करणे. आज गजेंद्रचा योग आहे. आजपर्यंत कितीतरी महान संकटे त्याच्या भोवती निर्माण झाली.
गजेंद्र हा अलीकडचा नसून, आमच्या अवतार कार्याच्या वेळचा आहे. सेवेकरी असावा तर असा असावा. माझे कार्य ८ ते १० हजार वर्षांच्या पाठीमागचे आहे. गजेंद्र त्यावेळीं संकटात सापडला, त्याची जाणीव आपल्याला असेलच. त्यावेळीं मगर रूपी राक्षसाच्या तावडीत सापडला असताना, महाप्रयासाने त्याची सुटका करण्यात आली. त्यावेळेपासून आतापर्यंत गुप्तरितीने या ठिकाणी त्याचे वास्तव्य आहे. त्यानें अनेक राक्षसांचा संहार केला आहे.
आठवा अवतार उत्तरेला झाला असताना, गजेंद्राने दक्षिणेत श्रेष्ठ दर्जाचे कार्य केले आहे. परंतु त्याचा उद्धार होऊ शकला नाही. आपणाला जाणीव असेल, सर्प योनीत असताना, मायावी तऱ्हेने हे रुप नटवलें होतें.
आज गजेंद्रचा उद्धार करावयाचा आहे. आदेश द्या. आपल्या हातून हे कार्य व्हावयास पाहिजे. हल्लीं हेच अवतार कार्य चालू आहे. ज्यावेळेला आमचे अवतार कार्य झाले, त्यावेळेला हिच स्थिती होती. सगळीकडे बजबजपूरी माजली होती. अशावेळी दक्षिणेत येण्याचे कारण अघोरी तत्त्वांचा नाश व ऋषी गणांचा उद्धार करणे होय. हेच कार्य करावयाचे होते. ज्यावेळी आपल्या अवतार कार्याचा शुभदिन निर्माण होईल, त्यावेळेला जे काही आपल्या दृष्टोत्पत्तीस येत आहे, ते सर्वस्व बंद होईल. इच्छा शक्तीचा नाश करता येत नाही. अघोरी इच्छेप्रमाणे कार्य पण अघोरी असते.
आपण ज्या भूमीत गजेंद्राला आदेश देऊन मुक्त करणार आहात, त्याठिकाणी आपल्या इच्छेप्रमाणे कृती करण्यास हरकत नाही. गजेंद्र हे कार्य आनंदाने करील. (समाप्त)©️