श्री संत ज्ञानेश्वर – समर्थ आसनाचे अधिकार सांगावयास माझी बालबुद्धी किती आहे, मला सुद्धा याची गती नाही, अंत नाही.
आसन या तीन अक्षरांमध्ये काय ब्रम्हांड भरले आहे याचा अंत कोणालाही नाही अन कोणी लावलेला नाही. मी जरी ज्ञानाचा ईश्वर, सागर असलो तरीपण या आसनाचा ठाव घेता येणार नाही, शोध लावता येणार नाही. तीन ताळ,सप्तपाताळ, २१ स्वर्ग यांनाही शोध लागलेला नाही, पण या आसनाची महती फार आहे. हे मामुली आसन नाही. हे आसन प्रत्यक्ष जगत् नियंत्याचे आहे. जे उत्पत्ती, स्थिती, लय करणारे असे सर्वस्व कारभार हाकूनहीं अलिप्त असणारे, अशी जी परम् शक्ती त्यांचे हे आसन आहे. हे मानवांना दिसायला शुल्लक जरी असले, तरी त्याची महती फार मोठी आहे. हे फार खोल आहे. याचे मोजमाप घेणारा कोणीही नाही अन कोणीही घेऊ शकणार नाही. बोलविता धनी फार वेगळा आहे. हे पूर्णत्वाने माहित आहे. या आसनाची महती सांगण्याचे भाग्य मला लाभले, धन्य आहे मी! या आसनाला सर्व जगत, सर्व पृथ्वी लिन आहे, तरीसुद्धा आसनाची महती कळली नाही. जो या आसनाजवळ दोन पळ का होईना लिन झाला, त्याचा उद्धार झाला हे निश्चित आहे. हे आसन तारक आहे, मारक नाही. याच्या सानिध्यात ज्योत, एक क्षण जरी आली तरी भाग्यवान आहे. ©️
या आसनाजवळ सत आचरण, शुद्ध भाव, पूर्ण श्रद्धा असे असल्यानंतर आत्मियतेने क्षणभर जरी दृढ झाला, तरी त्याला चारही देहाची मुक्ती मिळते. आपल्या सद्गुरूंवर परम श्रद्धा असलीच पाहिजे. एकाच ठिकाणी बसून आपल्या सद्गुरूं चरणांचा ठाव घेऊन त्यात क्षणभर जरी लिन झाला, तरी त्याने चारही मुक्ती साधल्यासारखे आहे. सद्गुरूंना ओढण, तशी सेवेकर्यांना ओढण लागते. ही ओढण फार निराळी आहे. ही आत्मीयतेची ओढण असते.