श्री बाबा – अखंड संपत्तीच्या ठिकाणी सुखही नाही आणि दुःखही नाही.
अखंड संपत्ती म्हणजे काय? अखंड ह्या शब्दाचा अर्थ ज्याला खंड नाही, खंडत्व नाही, खंडण नाही, ते अखंड ! येथे संपत्ती म्हणजे स्थावर-जंगम मालमत्ता नव्हे, तर सतपदाच्या आसनावरुन, सतपदाकडून अर्थात सद्गुरु मुखातून सत् भक्ताला मिळालेले अखंड नाम होय !
हे नाम कोणाचे? तर साक्षात सद्गुरुंचे, सताचे, अनंताचे, आकाराचे, निराकाराचे – ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, विकार नाही, गंध नाही, सुगंध नाही, ज्याला कल्प नाही, विकल्प नाही, जे असूनही अलिप्त आहेत, जे नसूनही असल्या सारखेच आहेत ! ज्यांना पापही नाही आणि पुण्यही नाही, ज्यांना सुखही नाही आणि दुःखही नाही असे जे आकारी असूनही निराकारी आहेत आणि निराकारी असूनही आकारी आहेत ! जे नामातही आहेत आणि नामातीतही आहेत !
आपले प्रवचन जडत्वावर चालले आहे. जड आहे तोपर्यंत सुखही आहे आणि दुःखही आहे. पापही आहे आणि पुण्यही ही आहे. म्हणून जडत्व आहे तोपर्यंत सुखदुःख हे आहेच. सुख आणि दुःख हे कशाने निर्माण होते? ते मनाच्या कलाटणीने निर्माण होते. मानव हा सुखासाठी झटतो. मग दुःख येते कोठून? ही सुखदुःख जी वाटतात ती तुम्हीच निर्माण केलेली असतात. तुमची कृती सत शुद्ध, निती युक्त असेल तर दुःख निर्माण होईल का? पण सुख कधी स्थिर राहिलं आहे का? कायम सुखी झाला आहात का? मग सुख कोठे आहे? दु:ख सहन करण्याची ज्याला ताकद आहे, त्याला सुख जास्त मिळते. जो दुसऱ्यासाठी दुःख सहन करतो त्याला समर्थ सुख देतात. दुःखाचा परिहार करण्यासाठी झटणारा फार निराळा आहे. फक्त शाब्दिक सहानुभूती दाखविणारे फार आहेत. दुःखही तुमच्या संचिताचे फळ आहे. तुमच्या कृतीतून ते निर्माण झालेले आहे. आदेश न मानणारे सेवेकरी यांना शांती कशी मिळेल? ज्यांचे मन अस्थिर तो दु:खी. ज्याचे मन स्थिर तो सुखी. ©️